Video - केरळमध्ये प्रचारादरम्यान दोन पक्षांमध्ये तुंबळ हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 04:54 PM2019-04-22T16:54:59+5:302019-04-22T16:58:37+5:30
केरळच्या कोल्लममध्ये Left Democratic Front (LDF) आणि United Democratic Front (UDF) च्या कार्यकर्त्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.
कोल्लम - केरळच्या कोल्लममध्ये Left Democratic Front (LDF) आणि United Democratic Front (UDF) च्या कार्यकर्त्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांना लाठ्या काठ्यांनी मारहाण केली आहे. केरळमध्ये प्रचारादरम्यान दोन पक्षांमध्ये झालेल्या या हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे मंगळवारी (23 एप्रिल) पार पडणार आहे. या टप्प्यासाठी रविवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सारेच पक्ष शक्ती प्रदर्शन करत होते. केरळमध्ये देखील प्रचार सुरू होता. कोल्लम जिल्ह्यातील पुयाप्पल्ली येथे Left Democratic Front (LDF) आणि United Democratic Front (UDF) या पक्षाचे कार्यकर्ते रोड शो दरम्यान एकमेकांसमोर आले.
#WATCH Kerala: Left Democratic Front (LDF) and United Democratic Front (UDF) workers clash in Pooyappally, Kollam on the last day of campaigning for Lok Sabha elections in the state. (21.4.19) pic.twitter.com/bSSelsm9Zo
— ANI (@ANI) April 22, 2019
दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला वाद झाला. मात्र थोड्या वेळाने या वादाचे रुपांतर हे हाणामारीत झाले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये रोड-शो दरम्यान हाणामारी झाली. कार्यकर्त्यांनी आपल्या हातातील झेंड्याच्या काठीनेच एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. या हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. पोलिसांनी यामध्ये तातडीने हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
आंध्र प्रदेशामध्ये याआधी काही दिवसांपूर्वी पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी मारहाणीच्या घटना समोर आली होती. अनंतपूरमधील ताडीपत्रीमध्ये वायएसआर काँग्रेस आणि तेलगू देशम पक्ष (टीडीपी) कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये एका टीडीपी नेता एस. भास्कर रेड्डी यांचा मृत्यू झाला होता. तसेच, आंध्र प्रदेश विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांच्यासह 10 जण जखमी झाले होते. याशिवाय, राज्यात अनेक ठिकाणी तुंबळ हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या. यावेळी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.
जगातील सर्वात मोठी लोकशाही हे मानाचं बिरूद मिरवणाऱ्या आपल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. त्यानुसार या कालावधीत लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. एकूण 7 टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल, असे केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी जाहीर केले होते. 17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे.