अमित शाह पाठोपाठ योगी आदित्यनाथ यांच्या सभेला पश्चिम बंगालमध्ये बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 12:25 PM2019-05-14T12:25:27+5:302019-05-14T12:39:32+5:30
पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीत राजकीय रस्सीखेच सुरु असल्याचे पहायला मिळत आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीचे सहा टप्यात मतदान पार पडले असून शेवटच्या टप्यात १९ तारखेला मतदान होणार आहे. त्यापूर्वी, पश्चिम बंगालमध्ये मात्र राजकीय युद्ध पहायला मिळत आहे. प्रचार सभांना परवानगी मिळवण्यावरून राजकीय वातावरण तापत असल्याचे दिसत आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची सभा रद्द झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा रद्द करण्यात आली आहे.
पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात १९ मे रोजी ९ मतदार संघात मतदान होणार आहे. त्यासाठी अमित शहांच्या सोमवारी ३ ठिकाणी सभा होणार होत्या. मात्र सुरक्षेचे कारण सांगत त्यांच्या जाधवपुर येथील सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. त्याचप्रमाणे, १५ मी रोजी योगी आदित्यनाथ यांच्या एका सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे पहायला मिळत आहे.
जाधवपूर येथील सभाची परवानगी नाकरल्यानंतर शहा यांनी मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. विजयनगर मध्ये तर मी आलो,जाधवपूर मध्ये गेलो असतो तर ममता दीदींनी उमेदवारी दिलेल्या त्यांचे पुतणे पडले असते. म्हणून आमची सभा रद्द करण्यात आली असल्याचे आरोप अमित शहा यांनी केले.
पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीत राजकीय रस्सीखेच सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. अमित शहांच्या सभा आणि हेलिकॉप्टर लँडिंग परवानगी नाकारण्यात आली होती, आता योगी आदित्यनाथयांच्या सभेला परवानगी देण्यास नकार देण्यात आला आहे. दुसरीकडे, भाजप केंद्रीय सत्तेच्या ताकदीचा उपयोग करून निवडणुकीत स्वतःचा प्रभाव पाडण्याच्या प्रयत्न करत असल्याचा आरोप ममता बनर्जी यांनी केला आहे.