मोदी उच्चवर्णीयच, राजकीय फायद्यासाठी झाले मागास : मायावती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 03:56 PM2019-04-28T15:56:51+5:302019-04-28T15:59:53+5:30
पंतप्रधान मोदी आधी उच्च जातीचे होते. परंतु, कालांतराने ते मागास जातीचे झाले. आम्ही पंतप्रधान मोदींना कधीही नीच म्हटले नाही. संपूर्ण सन्मानाने आम्ही त्यांना उच्चवर्णीय समजले. मग त्यांना नीच म्हणण्याचा विषय आलाच कुठून, असा सवाल मायावती यांनी उपस्थित केला.
नवी दिल्ली - बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायवती यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी उच्चवर्णीय होते. मात्र गुजरातमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी आपल्या जातीला मागास वर्गात समाविष्ट केले. मागास लोकांचा हक्क हिसकावण्यासाठी आणि राजकीय फायद्यासाठी मोदी मागास वर्गात सामील झाल्याचा आरोप मायावती यांनी केला. तसेच मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्याप्रमाणे मोदी जन्मत: मागास नाहीत, असंही मायावती यांनी पत्रकार परिषदेते सांगितले.
कनोज येथील सभेत मोदी म्हणाले की, मी मागास जातीचा आहे. त्यामुळे विरोधक आपल्याला नीच म्हणतात. अखिलेश आणि मायावती यांनी देखील आपल्याला नीच म्हटल्याचं मोदींनी सांगितले. मात्र मोदींचा हा आरोप कुरापत करणार असून तथ्यहीन असल्याचे मायावती यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी आधी उच्च जातीचे होते. परंतु, कालांतराने ते मागास जातीचे झाले. आम्ही पंतप्रधान मोदींना कधीही नीच म्हटले नाही. संपूर्ण सन्मानाने आम्ही त्यांना उच्चवर्णीय समजले. मग त्यांना नीच म्हणण्याचा विषय आलाच कुठून, असा सवाल मायावती यांनी उपस्थित केला.
यावरून असंच दिसत की, मोदीजी त्यांच्या नजरेत उच्चवर्णींना देखील नीच समजतात, असा टोला मायावती यांनी लगावला. तसेच मोदी आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष दलितांना कायम नीच समजत आला. कधीच ते दलित आणि मागास जातींच्या पाठिशी राहिले नाही. हैदराबादमधील रोहित वैमुला आणि उन्नामध्ये झालेल्या घटना याच्या साक्षीदार असल्याचे मायवती यांनी सांगितले. त्यामुळे 'जाति पाती जपना और दलितों और पिछडों का वोट हडपणा' हे धोरण आता चालणार नाही, असंही मायावती यांनी सांगितले.
दरम्यान मागील पाच वर्षांच्या सत्ता काळात भाजपने दिलेल्या आश्वासनांच्या २५ टक्के देखील काम केले नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशात आतापर्यंत झालेल्या तीन टप्प्यातील निवडणुकीत भाजप पिछाडीवर असल्याचा दावा मायावती यांनी केला आहे.