नरेंद्र मोदींचा समान नागरी कायद्याकडे इशारा ?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 09:16 PM2019-05-23T21:16:09+5:302019-05-23T21:16:43+5:30
लोकसभा निकालामुळे देशातील तमाम समाजशास्त्रींना विचार करण्यास गरीब जनतेने भाग पाडले आहे. यावेळी देशात दोनच जाती असून एक म्हणजे गरीब आणि दुसरी म्हणजे गरीबी दुर करणारी आहे, असं मोदी म्हणाले.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये भाजपप्रणीत एनडीएने शानदार विजयाची नोंद केली. एकट्या भाजपनेच बहुमतापेक्षा अधिक जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. यामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला असून जनतेने जाती-पातीच्या राजकारणाला फाटा दिल्याचे चित्र आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाती-पातीचे राजकारण सोडण्याकडे इशारा देत देशात केवळ दोनच जाती राहणार असल्याचे म्हटले. अर्थात मोदींनी समान नागरिक कायद्यासाठी प्रयत्न करणार, अस तर मोदींना म्हणायचं नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
लोकसभा निकालामुळे देशातील तमाम समाजशास्त्रींना विचार करण्यास गरीब जनतेने भाग पाडले आहे. यावेळी देशात दोनच जाती असून एक म्हणजे गरीब आणि दुसरी म्हणजे गरीबी दुर करणारी. जातीच्या नावावर खेळ खेळणाऱ्या लोकांवर या निवडणुकीत प्रहार करण्यात आला आहे. गरीबा आणि गरीबी दूर करणारी या दोनच जाती देशात राहणार असल्याचे मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या जाती संदर्भातील वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. २०१४ मध्ये समान नागरिक कायद्यासाठी भाजप प्रयत्न करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र मागील पाच वर्षांच्या काळात त्यावर काहीही हालचाल झाली नाही.
दरम्यान २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे समान नागरिक कायद्यासंदर्भात भाजप विचार करण्याची शक्यता आहे. मात्र जातीवादावर अंकूश आणण्यासाठी समान नागरिक कायदा आणण्याच्या विचारात भाजप आहे का, हे येणारा काळच सांगणार आहे. भाजपला दिलेल्या प्रचंड बहुमतानंतर मोदींनी नजतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे म्हटले.
देशात उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांत सर्वाधिक प्रमाणात जाती-पातीचे राजकारण होत आले आहे. परंतु, या लोकसभा निवडणुकीत जातीची समीकरणे पूर्णपणे विफल ठरल्याचे चित्र आहे. या दोन राज्यांत भाजप नेत्यांनी ज्याप्रमाणे विजय मिळवला, त्यावर जाणकारांच्या मते जनता आता जातीच्या राजकारणातून बाहेर आल्याचे दिसून येते