Lok Sabha Election 2019 : अमित शाह यांच्याविरुद्ध गांधीनगरात राष्ट्रवादी ?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 03:56 PM2019-03-25T15:56:28+5:302019-03-25T16:01:40+5:30
१९८९ मध्ये भाजप कुणाला माहित नसताना वाघेला यांनी येथून विजय मिळवला होता. आता देखील वाघेला तो चमत्कार करू शकतात, असं एनसीपीच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार मास्ट्ररस्ट्रोक लगावण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याविरुद्ध गांधीनगर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांना उतरविण्याची शक्यता आहे. गुजरातेत अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात जागा वाटपाची चर्चा पूर्ण झाली नाही. परंतु, एनसीपी वाघेला यांना लोकसभेच्या रणांगणात उतरविण्याची शक्यता आहे.
शंकर सिंह वाघेला यांनी १९८९ मध्ये भाजपला गांधीनगर येथून विजय मिळवून दिला होता. त्यानंतर हा मतदार संघ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना मिळाला. आता या मतदार संघातून अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजकीय जाणकारांच्या मते येथून अमित शाह यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे. कारण यापूर्वी लालकृष्ण अडवाणी या मतदार संघातून नियमीत निवडून आलेले आहे. परंतु, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी गांधीनगरमधून शंकरसिंह वाघेला यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. यावर शरद पवार काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
१९८९ मध्ये भाजप कुणाला माहित नसताना वाघेला यांनी येथून विजय मिळवला होता. आता देखील वाघेला तो चमत्कार करू शकतात, असं एनसीपीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. १९९१ मध्ये वाघेला यांनी अडवाणी यांच्यासाठी हा मतदार संघ सोडला होता. काही दिवसांपूर्वीच वाघेला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
गांधीनगर लोकसभा मतदार संघात सात विधानसभा असून यापैकी तीन विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात ठाकोर समूदाय आहे. या समूहाला वाघेला आपल्याकडे खेचू शकतात. तसेच काँग्रेसकडे देखील अमित शाह यांना आव्हान देईल एवढा दिग्गज नेता गुजरातमध्ये नाही. दरम्यान वाघेला यांनी आधीच लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले. परंतु राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी वाघेला यांना गळ घातल्यास ते तयार होतील, असंही सांगण्यात येते.