एवढा भित्रा अन् कमकुवत पंतप्रधान उभ्या आयुष्यात पाहिला नाही- प्रियंका गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 04:48 PM2019-05-09T16:48:34+5:302019-05-09T16:50:17+5:30
लोकसभा निवडणूक 2019च्या सहाव्या टप्प्याच्या मतदानासाठी राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे.
नवी दिल्लीः लोकसभा निवडणूक 2019च्या सहाव्या टप्प्याच्या मतदानासाठी राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणांमधून राजीव गांधींवर करत असलेल्या टीकेलाही काँग्रेस जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. उत्तर प्रदेशमधल्या प्रतापगडमध्ये झालेल्या रॅलीदरम्यान प्रियंका गांधींनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा पंतप्रधान मोदींना लक्ष्य करत म्हणाल्या, यांच्या एवढा भित्रा आणि कमकुवत पंतप्रधान उभ्या आयुष्यात पाहिला नाही.
प्रचारात मोठंमोठी विधानं केल्यानं राजकीय शक्ती वाढत नाही. त्या म्हणाल्या, जनता सर्वात मोठी असल्याचं जो मानतो तीच खरी राजकीय शक्ती असते. जनतेचे प्रश्न ऐकण्याची शक्ती, जनतेचे प्रश्न सोडवण्याची शक्ती, टीका झेलण्याची शक्ती, विरोधकांची विधानं ऐकून घेण्याची शक्ती हीच खरी शक्ती असते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेच्या प्रश्नांना उत्तर देणं योग्य समजत नाही. मोदी आणि पंतप्रधान यांच्यातही जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. तर दुसरीकडे मोदी राजीव गांधींवर वारंवार टीका करत आहेत. मोदींनी रोजगार, जीएसटी सारख्या मुद्द्यांवर निवडणूक लढवावी, असं आव्हानही प्रियंका गांधींनी दिलं आहे.