जेलमधील अत्याचारामुळे साध्वी प्रज्ञा सिंहांना कर्करोग : रामदेवबाबा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 02:37 PM2019-04-27T14:37:18+5:302019-04-27T14:48:06+5:30
आपण महिलांबद्दल संवेदनशीलता दाखवली पाहिजे. प्रज्ञा सिंह यांच्या मनात दुख: आहे त्यामुळेच त्यांनी हेमंत करकरे यांच्याबद्दल असे विधान केले असावे. वादग्रस्त विधानाबद्दल रामदेवबाबांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी उत्तर दिले.
मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर जेलमध्ये असताना त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. त्यामुळेच, त्यांना कर्करोग झाला असल्याचा दावा योगगुरु रामदेवबाबा यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी गुरु पटना साहिब लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दाखल केली, यावेळी रामदेवबाबा पत्रकारांशी बोलत होते.
रामदेवबाबा पुढे बोलताना म्हणाले की, संशयचा आधारावर ९ वर्षे साध्वी प्रज्ञा सिंहांना जेलमध्ये ठेवण्यात आले, दहशतवाद्या प्रमाणे त्यांना वागणूक देण्यात आली. प्रज्ञा सिंहांना मानसिक आणि शारीरिक त्रास दिला गेला. जेलमधील अत्याचारामुळे साध्वीना अशक्तपणा आला आणि त्यामुळेच कर्करोग झाला असल्याचा दावा रामदेवबाबांनी केला.
आपण महिलांबद्दल संवेदनशीलता दाखवली पाहिजे. प्रज्ञा सिंह यांच्या मनात दुख: आहे त्यामुळेच त्यांनी हेमंत करकरे यांच्याबद्दल असे विधान केले असावे. असे मत रामदेवबाबांनी व्यक्त केले.
भोपाळ लोकसभा मतदार संघातून भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल त्यांच्यावर चोहीबजुने टीका होत आहे. दुसरीकडे मात्र, भाजपचे राष्टीय अध्यक्ष अमित शहांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांना समर्थन दिले असतांनाच आता रामदेवबाबा यांनी सुद्धा साध्वी प्रज्ञा सिंह यांना पाठींबा दर्शवला आहे.