बलात्कारातील आरोपी उमेदवार प्रचार न करताच खासदारपदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 04:30 PM2019-05-25T16:30:57+5:302019-05-25T16:36:29+5:30
अतुल कुमार यांच्यावर बलात्काराचा आरोप असून पोलिस त्यांच्या शोधात होते. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्या दिवसापासून ते फरार होते. बनारसमधील युपी महाविद्यालयातील माजी विद्यार्थीनीने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षप्रणीत एनडीएने ३५० हून अधिक जागा मिळवून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. मात्र आणखी एक धक्कादायक निकाल उत्तर प्रदेशातून समोर आला आहे. बलात्काराचे आरोपी बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अतुल कुमार सिंह यांना प्रचार न करताच विजय मिळाल्याचे समोर आले आहे.
अतुल कुमार यांच्यावर बलात्काराचा आरोप असून पोलिस त्यांच्या शोधात होते. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्या दिवसापासून ते फरार होते. बनारसमधील युपी महाविद्यालयातील माजी विद्यार्थीनीने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. तसेच तक्रार देखील दिली होती. त्यानंतर पोलिस त्यांच्या शोधात होते. जामीन मिळावा म्हणून अतुल सिंह सर्वोच्च न्यायालयात गेले होते. मात्र त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यामुळे त्यांना निवडणुकीत प्रचार करणे शक्य झाले नाही.
दरम्यान अतुल सिंह यांच्या गैरहजेरीत बसपा आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या प्रचाराची जबाबदारी पार पाडली. खुद्द बसपा प्रमुख मायावती अतुल सिंह यांच्यासाठी मैदानात उतरल्या होत्या. तसेच अतुल सिंह यांना भाजपने फसवल्याचा आरोप केला होता.
लोकसभा निवडणुकीच्या काळात अतुल सिंह यांना पकडण्यासाठी पोलिसांनी अनेकदा त्यांच्या घरी धाड टाकली. मात्र ते कधीही पोलिसांच्या हाती लागले नाही. त्यातच अतुल सिंह परदेशात पळून गेल्याचा दावा करण्यात आला होता. तर त्यांचे कार्यकर्ते जनतेत जावून अतुल सिंह यांच्यासाठी मत मागत होते. अखेरीस अतुल सिंह यांचा विजय देखील झाला. अतुल कुमार सिंह यांना ५ लाख ७२ हजार ४५९ मते मिळाली. तर भाजपचे पराभूत उमेदवार हरिनारायण यांना ४ लाख ४९ हजार २१२ मते मिळाली.