...म्हणून अडवाणींच्या जागी अमित शहा दिले, एका दगडात दोन पक्षी मारले!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 10:13 AM2019-03-22T10:13:46+5:302019-03-22T10:20:18+5:30
गांधीनगर लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा गडच मानला जातो.
गेली तीन दशकं गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगरचं लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचं तिकीट यावेळी कापण्यात आलंय. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'राईट हँड' असणारे अमित शहा गांधीनगर मतदारसंघातून रिंगणात उतरणार आहेत. ही अदलाबदल अनेकांच्या पचनी पडत नाहीए. राजकीय वर्तुळातही उलटसुलट चर्चा रंगलीय. परंतु, ९१ वर्षीय अडवाणींची जागा अमित शहांना देण्याचा भाजपाचा निर्णय अत्यंत चतुराईनं घेण्यात आलाय आणि एका दगडात त्यांनी दोन पक्षी मारलेत, असं राजकीय जाणकारांचं मत आहे.
गांधीनगर लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा गडच मानला जातो. भाजपाच्या संस्थापकांपैकी एक असलेले लालकृष्ण अडवाणी १९९१ मध्ये पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून आले होते. १९९६ साली अटलबिहारी वाजपेयी यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर १९९८ पासून आत्तापर्यंत अडवाणी इथले खासदार आहेत. वास्तविक, २०१९ची निवडणूक लढवण्याचीही त्यांची इच्छा होती. परंतु, ९१ वर्षीय अडवाणींची समजूत काढून भाजपानं अमित शहांची उमेदवारी निश्चित केली. त्यामुळे गांधीनगरचं तिकीट बड्या नेत्याला देण्याची परंपरा कायम राहिली आहेच, पण पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये उत्साह, जोश निर्माण करण्याचा उद्देशही साध्य होणार आहे.
लोकसभेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर, गांधीनगरमधून अडवाणींचा पत्ता कापला https://t.co/2KFUuklA5U@BJP4India@CMOMaharashtra@narendramodi@INCIndia@NCPspeaks
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 21, 2019
२०१७च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं भाजपाला जोरदार टक्कर दिली. लोकसभा निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या 'होमपीच'वर आव्हान देण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसली आहे. ५८ वर्षांनंतर त्यांनी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक गुजरातमध्ये घेऊन आपले इरादे स्पष्ट केले होते. त्यामुळे भाजपालाही ठोस पावलं उचलणं भाग होतं. त्याच दृष्टीने, अमित शहांना गांधीनगरमधून रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे. नरेंद्र मोदी यंदाही वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे एक वजनदार नाव गुजरातमधून देणं भाजपासाठी महत्त्वाचं होतं. ते ओळखूनच अमित शहांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं समजतं. अमित शहा यांनी सुरुवातीच्या काळात कार्यकर्ते म्हणून गांधीनगर मतदारसंघाची जबाबदारी सांभाळली आहे. आता तर ते पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि मोदींचे अत्यंत विश्वासू शिलेदार मानले जातात. गुजरातला आम्ही गृहित धरत नाही आहोत, हा संदेश या निमित्ताने भाजपाने दिलाय, त्याचा उपयोग त्यांना वातावरणनिर्मितीसाठी होऊ शकेल.
दरम्यान, लालकृष्ण अडवाणींना समजावण्याची जबाबदारी पक्षाचे नेते रामलाल आणि ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्याकडे देण्यात आली होती. अडवाणींचं मन वळवण्यासाठी त्यांना बराच खटाटोप करावा लागल्याचं समजतं. अडवाणी यांच्यासोबतच, शांता कुमार, भगतसिंह कोश्यारी या ज्येष्ठ नेत्यांनाही भाजपानं निवडणुकीपासून दूर ठेवलं आहे. मुरली मनोहर जोशी यांच्या कानपूरच्या जागेसाठी अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही, परंतु त्यांचाही पत्ता कापला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.
भाजपाकडूनही घराणेशाहीलाच बळ, उमेदवारांना मिळालं 'पूर्व पुण्याई' फळ https://t.co/vOlSXAo2sV
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 21, 2019
रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येईल, उमेदवारी जाहीर होताच गडकरींचा विश्वास https://t.co/qdBZfVSR9G
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 21, 2019