तेज बहादूरचा उमेदवारी अर्ज रद्द केल्यानं SCनं निवडणूक आयोगाकडे मागितलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 12:44 PM2019-05-08T12:44:43+5:302019-05-08T12:46:42+5:30
सर्वोच्च न्यायालयानंही तेज बहादूर यांची याचिका दाखल करून घेत निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात उत्तर मागितलं.
नवी दिल्लीः सीमा सुरक्षा बलातून बडतर्फ करण्यात आलेल्या तेज बहादूर यादव यांनी वाराणसीतून मोदींविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगानं त्यांचा तो अर्ज रद्द केला. तेज बहादूरनं याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयानंही तेज बहादूर यांची याचिका दाखल करून घेत निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात उत्तर मागितलं. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात उद्या सुनावणी करणार आहे. निवडणूक आयोगाने मागितलेले सर्व पुरावे आम्ही दाखल केले होते, तरीही माझी उमेदवारी रद्द करण्यात आल्याचे तेजबहादूर यांनी म्हटले आहे.
तेज बहादूर यांची उमेदवारी रद्द केल्यामुळे सपा-बसपाच्या गोटातही खळबळ उडाली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना लष्कराकडून प्रमाणपत्र देण्याची नोटीस बजावली होती. यावर तेज बहादूर यांनी दोन्ही नोटिशींना उत्तरे दिली, मात्र उमेदवारी दाखल केल्यापासून घाबरलेल्या पंतप्रधान मोदींनी अडचणी निर्माण केल्याचा आरोप तेज बहादूर यांनी केला. तसेच माझी उमेदवारी रद्द करणे चुकीचे असून मी निवडणूक आयोगाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे तेज बहादूर यांनी म्हटले आहे. वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आव्हान उभे करण्यासाठी सपा-बसपा महाआघाडीने मोठी खेळी खेळली.
सपा-बसपा महाआघाडीने वाराणसी येथील आपला उमेदवार बदलताना बडतर्फ बीएसएफ जवान तेज बहादूर यांना उमेदवारी जाहीर केली होती. तेज बहादूर आणि आणि आधीच्या उमेदवार शालिनी यादव यांनी समाजवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, नरेंद्र मोदींसमोर तेज बहादूर हेच उमेदवार असतील. तसेच शालिनी यादव या उमेदवारी अर्ज मागे घेतील, असे समाजवादी पक्षाने स्पष्ट केले होते. परंतु तेज बहादूर यांची उमेदवारी निवडणूक आयोगानं रद्द केल्यानं सपा-बसपाला धक्का बसला आहे.