केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेत 'ट्विस्ट'; हल्लेखोर तरुणाचा 'युटर्न'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 09:52 AM2019-05-10T09:52:27+5:302019-05-10T09:54:41+5:30
केजरीवाल यांच्यावर आपण हल्ला का केला हे माहित नाही. परंतु, मला या घटनेची खंत आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नसून मला हे कृत्य करण्यासाठी कुणीही सांगितले नसल्याचे युवकाचे म्हणणे आहे.
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निवडणूक प्रचारातील रोड शो दरम्यान एका युवकाने हल्ला केला. आता या घटनेत ट्विस्ट आला असून युवकाने या कृतीबद्दल दु:ख व्यक्त केले. हल्ला करणाऱ्या युवकाचे नाव सुरेश कुमार असून त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
केजरीवाल यांच्यावर आपण हल्ला का केला हे माहित नाही. परंतु, मला या घटनेची खंत आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नसून मला हे कृत्य करण्यासाठी कुणीही सांगितले नसल्याचे युवकाचे म्हणणे आहे. तरी पोलिसांनी मला योग्य वागणूक दिल्याचे सांगत आपण चूक केल्याचे पोलिसांनी लक्षात आणून दिल्याचे सुरेश म्हणाला.
सुरेशच्या प्रतिज्ञापत्रानंतर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे. यापुढे आपण कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात आपण सहभागी होणार नसल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच यापुढे आपण कोणत्याही नेत्यावर हल्ला करणार नाही, असंही त्याने सांगितले.
घटनेत भाजपचा हात, 'आप'चा आरोप
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यात भाजपचा हात असल्याचा आरोप 'आप'कडून करण्यात आला होता. तसेच या घटनेसाठी पीएम मोदी आणि अमित शाह जबाबदार असल्याचे म्हटले होते. पाच वर्षांत केजरीवाल यांचे काहीच वाकड करू शकले नाहीत, म्हणून भाजपकडून असे हल्ले करण्यात येत असल्याचा आरोप मनिष सिसोदिया यांनी केला होता.