दुश्मनी जमकर करो, लेकिन... सुषमा स्वराज यांचं ममता बॅनर्जींना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 10:30 AM2019-05-09T10:30:12+5:302019-05-09T13:38:40+5:30
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. या टीकेनंतर केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रियंका गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला असतानाच नेतेमंडळींमधील वाकयुद्धही जोर धरू लागले आहे. आपल्या विरोधातील नेत्यांविरोधात टीका करताना सर्वपक्षीय नेत्यांकडून आक्षेपार्ह टीका केली जाऊ लागली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. या टीकेनंतर केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रियंका गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे.
ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. 'मोदी हे दुर्योधन आणि रावणाचा अवतार आहे. त्यांना लोकशाहीची जोरदार चपराक मारावी वाटते' असं ममता यांनी म्हटलं होतं. त्याला सुषमा स्वराज यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'ममता जी, आज तुम्ही सर्व सीमा ओलांडल्या आहेत. 'तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्री आहात आणि मोदी जी हे देशाचे पंतप्रधान आहेत. उद्या तुम्हाला त्यांच्याशीच जुळवून घ्यायचं आहे. म्हणून तुम्हाला बशीर बद्र यांच्या एका शायरीची आठवण करून देते - दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों' असं ट्वीट स्वराज यांनी केलं आहे. तसेच ममता यांना शेर ऐकवत त्यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
ममता जी - आज आपने सारी हदें पार कर दीं. आप प्रदेश की मुख्यमंत्री हैं और मोदी जी देश के प्रधान मंत्री हैं. कल आपको उन्हीं से बात करनी है. इसलिए बशीर बद्र का एक शेर याद दिला रही हूँ :
— Chowkidar Sushma Swaraj (@SushmaSwaraj) May 7, 2019
दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे,
जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अहंकारी आणि दुर्योधनाची उपमा दिली होती. त्यावरून सुषमा स्वराज यांनी प्रियंका गांधींवर निशाणा साधला आहे. 'प्रियंका जी, तुम्ही अहंकाराची भाषा करता, मी तुम्हाला आठवण करुन देऊ इच्छिते की, अहंकाराची सीमा तर त्या दिवशीच पार झाली होती जेव्हा राहुल गांधींनी आपल्याच पंतप्रधान म्हणजेच डॉ. मनमोहन सिंग यांचा अपमान करत राष्ट्रपतींकडून प्रसिद्ध करण्यात आलेला अध्यादेश फाडून फेकला होता. कोण कुणाला ऐकवत आहे?' असं ट्वीट सुषमा स्वराज यांनी केलं आहे.
प्रियंका जी - आज आपने अहंकार की बात की. मैं आपको याद दिला दूँ की अहंकार की पराकाष्ठा तो उस दिन हुई थी जिस दिन राहुल जी ने अपने ही प्रधान मंत्री डाक्टर मनमोहन सिंह जी का अपमान करते हुए राष्ट्रपति द्वारा जारी अध्यादेश को फाड़ कर फेंका था. कौन किसको सुना रहा है ?
— Chowkidar Sushma Swaraj (@SushmaSwaraj) May 7, 2019
'वर्ड वॉर' : ममता म्हणाल्या, मोदींना जोरदार चपराक देण्याची इच्छा
लोकसभा निवडणुकीतील 'वर्ड वॉर' आणखीच पेटले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील शाब्दीक चकमक थांबायचे नाव घेत नाही. जय श्रीरामच्या घोषणेवरून मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ममता म्हणाल्या की, मोदी हे दुर्योधन आणि रावनाचा अवतार आहे. त्यांना लोकशाहीची जोरदार चपराक मारावी वाटते, असंही ममता यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींनी एका सभेत म्हटले होते की, पश्चिम बंगालमध्ये जय श्रीराम बोलणाऱ्यांना अटक करण्यात येते. राज्यात देवाचं नाव घेण्यास बंदी आहे. त्यावर ममता यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. मोदी पश्चिम बंगालमध्ये आल्यानंतर म्हणतात, तृणमूल काँग्रेस गुंडांचा पक्ष आहे. त्याचवेळी मनात आले की, मोदींनी जोरदार चपराक ठेवून द्यावी. मोदींना त्याची गरज आहे. आजपर्यंत असा खोटारडा पंतप्रधान पाहिला नाही. निवडणुका आल्या की यांना राम आठवतो, अच्छे दिनचे स्वप्न दाखवले आणि नोटबंदी केली, अशी घणाघाती टीका ममता यांनी केली.