ममतांना धक्का ! निकटवर्तीयसह टीएमसीचे 3 आमदार भाजपमध्ये ?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 01:05 PM2019-05-28T13:05:48+5:302019-05-28T13:57:57+5:30
ममता बनर्जी यांच्या जवळील नेते समजले जाणारे, मुकुल रॉय यांच्या नेतृत्वात टीएमसीचे आमदार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपने सुरु केला आहे.
नवी दिल्ली - पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि भाजप व टीएमसीमधील राजकीय युद्ध सुरूच आहे. त्यातच आता, मुख्यमंत्री ममता बनर्जींच्या निकटवर्तीयसह टीएमसीचे ३ आमदार व अनेक नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने पश्चिम बंगालमध्ये राजकीय तणाव वाढण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत बंगालमधील मिळालेल्या यशामुळे भाजप आता ममता बनर्जी यांना आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपने पश्चिम बंगालमध्ये आपली राजकीय खेळी सुरु केली असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत हिंसाचारऱ्यांच्या घटनांमुळे पश्चिम बंगाल चर्चेत आले होते. त्यात, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेला परवानगी नाकारल्याने भाजप आणि टीएमसी यांच्यातील वाद टोकाला पोहोचला होता. बंगालमध्ये चांगले यश मिळाल्याचे लक्षात येताच, भाजपने आता पश्चिम बंगालमध्ये फोडाफोडीचे राजकरण सुरु केले आहे. ममता बनर्जी यांच्या जवळील नेते समजले जाणारे, मुकुल रॉय यांच्या नेतृत्वात टीएमसीचे आमदार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपने सुरु केला आहे. आज सकाळीच मुकुल रॉय आणि आणखी 2 आमदार दिल्लीकडे रवाना झाले असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
तिकडे, मध्य प्रदेशमध्ये सुद्धा कमलनाथ यांनी आरोप केला आहे की, कॉंग्रेसच्या आमदारांना भाजपमध्ये येण्यासाठी पैसे आणि मंत्रीपद देण्याचे आमिष दाखवले जात आहे. तर, बीएसपीच्या आमदारांना कॉंग्रेसचा पाठींबा काढण्यासाठी 50-60 कोटीची ऑफर दिली जात असल्याचे ही आरोप होते आहे. त्यामुळे भाजपने लोकसभा बरोबर देशातील विधानसभा ही मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले असल्याचे दिसून येत आहे.