'वाराणसीच्या जनतेला खासदार नव्हे, तर पंतप्रधान निवडण्याचे भाग्य'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 10:58 AM2019-04-26T10:58:47+5:302019-04-26T10:58:57+5:30
२०१४ मध्ये मोदी यांनी वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी तीन लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला होता. यावेळी देखील मोदी वाराणसीमधील आपला कारिश्मा कायम राखणार का, याचा निर्णय येणाऱ्या काळात होणार आहे.
वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांना वाराणसी येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांनी वाराणसीमध्ये भव्य रोडशो केला. या रोड शोला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मोदी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असून एनडीएचे दिग्गज नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.
वाराणसी येथील जनता केवळ खासदार निवडणार नसून देशाचा पंतप्रधान निवडणार आहे. त्यामुळे वाराणसीची जनता भाग्यवान असल्याचे मत केंद्रीयमंत्री मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे. मोदींचा उमेदवारी अर्ज भरताना एनडीएचे एकाप्रकारे शक्तीप्रदर्शन सुरू आहे.
२०१४ मध्ये मोदी यांनी वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी तीन लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला होता. यावेळी देखील मोदी वाराणसीमधील आपला कारिश्मा कायम राखणार का, याचा निर्णय येणाऱ्या काळात होणार आहे.
२०१४ मध्ये मोदींनी आपले प्रतिस्पर्धी अरविंद केजरीवाल यांना ३ लाख ७७ हजार मतांनी पराभूत केले होते. त्यावेळी मोदींना ५ लाख ८१ हजार २२ मते मिळाली होती. तर केजरीवाल यांनी २ लाख ९ हजार २३८ मते मिळवली होती. त्यातच मागील साडेचार वर्षांत मोदींनी वाराणसीमध्ये ज्या पद्धतीने विकास केला, त्यावरून मतदार त्यांना डावलतील, याची शक्यता फारच कमी आहे.