रमजानच्या महिन्यात मतदान सकाळी सात ऐवजी पहाटे पाच वाजता सुरु करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 06:13 PM2019-05-02T18:13:15+5:302019-05-02T18:17:34+5:30
मुस्लीम समाजात रमजानचा महिना पवित्र मानला जातो. या महिन्यात मुस्लीम समाजात उपवास ठेवण्याची प्रथा आहे. याशिवाय, मे महिन्यामुळे तीव्र उन्हाळा असणार आहे. राजस्थान आणि इतर राज्यातील अतिउष्मा असणाऱ्या ठिकाणीही मतदान प्रक्रिया लवकर सुरू करावी अशी मागणी मुस्लीम समाजातून होत आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीतील उर्वरित तीन टप्प्यांमधील मतदानाच्या काळातच मुस्लीम समाजाचा रमजानचा महिना सुरू होत आहे. रमजानच्या महिन्यात मुस्लीम समाजातील व्यक्तींना उपवास असतात. उपवास असताना उन्हात घरा बाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळे, उरलेल्या तीन टप्प्यांमधील मतदान सकाळी सात ऐवजी पहाटे पाच वाजल्यापासून सुरु करावे, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिका मुस्लीम संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत.
मुस्लीम समाजात रमजानचा महिना पवित्र मानला जातो. या महिन्यात मुस्लीम समाजात उपवास ठेवण्याची प्रथा आहे. याशिवाय, मे महिन्यामुळे तीव्र उन्हाळा असणार आहे. राजस्थान आणि इतर राज्यातील अतिउष्मा असणाऱ्या ठिकाणीही मतदान प्रक्रिया लवकर सुरू करावी अशी मागणी मुस्लीम समाजातून होत आहे. याविषयी, मुस्लीम समाजाच्य वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
शेवटच्या तीन टप्प्यांमध्ये एकूण १६९ जागांसाठी मतदान होणार आहे. उन्हाचा पारा लक्षात घेत दुपारच्या वेळी घर बाहेर पडणे शरीरासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे, मतदानाच्या वेळात बदल करावा अशी मागणी मुस्लीम समाजाच्या वतीने केली जात आहे.
यासंदर्भातही निवडणूक आयोगाने योग्य तो निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले. आता या याचिकांवर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.