'यामुळे' अडवाणींनी नाकारली मुलीसाठीची उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 10:15 AM2019-03-22T10:15:50+5:302019-03-22T10:17:31+5:30
बालाकोट येथील कारवाईनंतर भाजप लाभ होणार हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे भाजप नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यानंतर अखेरीस भाजपकडून अडवाणी यांच्यासमोर निवडणूक न लढविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात असून विद्यमान खासदारांवर पुन्हा एकदा विश्वास दाखविण्यात आला आहे. परंतु, भाजपने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे गांधीनगर मतदार संघातून तिकीट कापल्याची सगळीकडे चर्चा आहे. आता यामागचे खरे कारण समोर आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह गांधीनगर येथून उमेदवार बदलण्यासाठी इच्छूक होते. भाजप नेतृत्व ७५ पेक्षा अधिक वय असलेल्या उमेदवारांना तिकीट देण्यासाठी सकारात्मक नव्हते. परंतु, भाजपचे संस्थापक सदस्य असलेले अडवाणी यांना हटविणे एवढे सोपे नव्हते. अडवाणी यांना बाजुला करण्यासाठी खुद्द पंतप्रधानांनी प्रयत्न केले होते. त्यांनी अनेकदा अडवाणी यांच्याकडे निवडणूक लढविण्यासंदर्भात चर्चा केली होती. परंतु अडवाणी यांनी स्पष्ट भूमिका मांडली नव्हती. मात्र बालाकोट येथील कारवाईनंतर भाजप लाभ होणार हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे भाजप नेत्यांचा आत्मविश्वास देखील वाढला आणि त्यानंतर अखेरीस भाजपकडून अडवाणी यांच्यासमोर निवडणूक न लढविण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
दरम्यान अडवाणी यांच्याकडे निवडणूक न लढविण्याचा आणि आपल्या पसंतीचा उमेदवार देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तसेच प्रस्तावात अडवाणी यांच्या मुलीला उमेदवारी देण्याचे देखील ठरले होते. परंतु, अडवाणी यांनी याला स्पष्ट नकार देत आपण आयुष्यभर घराणेशाहीचा विरोध केल्याचे म्हटले. तसेच सर्वांचे मत घेत निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली.