संसदेत २८० नवे खासदार; सेलिब्रिटी, राजकीय कार्यकर्ता, माजी न्यायमूर्तींसह अनेकांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 10:08 AM2024-06-07T10:08:08+5:302024-06-07T10:08:38+5:30

Lok Sabha Election 2024 : २०१९च्या निवडणुकीच्या तुलनेत हा आकडा वाढला असून, तेव्हा २६७ सदस्य पहिल्यांदाच खासदार झाले होते.

Lok Sabha Election 2024 : 280 new MPs in Parliament; Including former Chief Ministers, celebrities, political activists, ex-judges and many more | संसदेत २८० नवे खासदार; सेलिब्रिटी, राजकीय कार्यकर्ता, माजी न्यायमूर्तींसह अनेकांचा समावेश

संसदेत २८० नवे खासदार; सेलिब्रिटी, राजकीय कार्यकर्ता, माजी न्यायमूर्तींसह अनेकांचा समावेश

नवी दिल्ली : १८ व्या लोकसभेत माजी मुख्यमंत्री, चित्रपटतारे, राजकीय कार्यकर्ता आणि उच्च न्यायालयाचे एक माजी न्यायमूर्ती यांच्यासह पहिल्यांदाच निवडून आलेले सुमारे २८० खासदार पोहोचले आहेत. २०१९च्या निवडणुकीच्या तुलनेत हा आकडा वाढला असून, तेव्हा २६७ सदस्य पहिल्यांदाच खासदार झाले होते.

एकूण २६३ नवनिर्वाचित खासदारांनी यापूर्वी लोकसभेचे सदस्य म्हणून काम केले आहे. याव्यतिरिक्त १६ खासदार राज्यसभेचे सदस्य आहेत आणि एका खासदाराने लोकसभेत पोहोचण्याची कामगिरी सातव्या वेळा केली, अशी माहिती विचारगट पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्चने दिली आहे.

फेरनिवड झालेल्या खासदारांपैकी आठजणांनी आपला मतदारसंघ बदलला आणि एकजण दोन मतदारसंघातून निवडून आला. १७व्या लोकसभेत पुन्हा निवडून आलेल्या नऊ खासदारांनी वेगळ्या पक्षाचे प्रतिनिधित्व केले, तर इतर आठ खासदारांनी त्यांच्या पूर्वीच्या पक्षापासून फुटलेल्या पक्षाचे प्रतिनिधित्व केले. निवडणूक लढविलेल्या ५३ मंत्र्यांपैकी ३५ विजयी झाले आहेत.

अरुण गोविल, चंद्रशेखर आझाद लोकसभेत
उत्तर प्रदेशमधून ४५ सदस्य पहिल्यांदाच लोकसभेत पोहोचले आहेत. दूरदर्शन मालिका ‘रामायण’मध्ये भगवान रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल (मेरठ), अमेठी मतदारसंघातून केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांचा पराभव करणारे काँग्रेस नेते किशोरी लाल शर्मा, नगिना मतदारसंघातून दलित हक्क कार्यकर्ते आणि आझाद समाज पक्षाचे नेते चंद्रशेखर आझाद यांचा समावेश आहे.

राजघराण्यातील छत्रपती शाहू महाराज
राजघराण्यातील सदस्यांमध्ये छत्रपती शाहू महाराज (कोल्हापूर), यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार (म्हैसूर) आणि कृती देवी देबबरमन (त्रिपुरा पूर्व) यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमधील तमलुक लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय हेही पहिल्यांदाच खासदार झाले आहेत.

मनोरंजन विश्वातून कंगना रणाैत, सुरेश गोपी
अभिनयाशी संबंधित आणि लोकसभेवर पहिल्यांदा निवडून आलेल्यांमध्ये केरळमधील त्रिशूर मतदारसंघातून सुरेश गोपी आणि मंडीतून निवडून आलेल्या कंगना रणाैत यांचा समावेश आहे. राज्यसभा सदस्य अनिल देसाई (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे), भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, मनसुख मांडविया आणि पुरुषोत्तम रुपाला यांनीही पहिल्यांदाच लोकसभेत प्रवेश केला आहे.

नारायण राणेंसह अनेक माजी मुख्यमंत्री : पहिल्यांदा लोकसभेत पोहोचलेल्या माजी मुख्यमंत्र्यांमध्ये नारायण राणे (रत्नागिरी-सिंधुदुर्ग), त्रिवेंद्रसिंग रावत (हरिद्वार, उत्तराखंड), मनोहर लाल (कर्नाल, हरयाणा), बिप्लब कुमार देब (त्रिपुरा पश्चिम, त्रिपुरा), जीतन राम मांझी (गया, बिहार), बसवराज बोम्मई (हावेरी, कर्नाटक), जगदीश शेट्टर (बेळगाव, कर्नाटक), चरणजित सिंग चन्नी (जालंधर, पंजाब) यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातून ३३ नवे सदस्य : महाराष्ट्रातून पहिल्यांदाच लोकसभेत ३३ सदस्य पोहोचले आहेत. त्यात शिक्षक भास्कर भगरे यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून प्रथमच लोकसभेवर निवडून आलेल्या सदस्यांमध्ये मुंबई उत्तरमधून भाजपचे पीयूष गोयल, अमरावतीमधून काँग्रेसचे नेते बळवंत वानखेडे, अकोल्याहून माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे आणि सांगलीतून अपक्ष सदस्य विशाल पाटील यांचा समावेश आहे.

Web Title: Lok Sabha Election 2024 : 280 new MPs in Parliament; Including former Chief Ministers, celebrities, political activists, ex-judges and many more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.