लोकसभा निवडणुकीपूर्वी या राज्यात आपला मोठा धक्का, बड्या नेत्याने दिला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 04:31 PM2024-01-16T16:31:07+5:302024-01-16T16:32:17+5:30
AAP News: भाजपाला आव्हान देण्याची तयारी करत असलेल्या आम आदमी पक्षाला छत्तीसगडमध्ये मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाचे छत्तीसगडमधील प्रदेशाध्यक्ष कोमल हुपेंडी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्या नेत्यांमध्ये आनंद प्रकाश गिरी आणि रवींद्र सिंह यांच्याही नावाचा समावेश आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी आम आदमी पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीमधून लोकसभेची निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. दरम्यान, भाजपाला आव्हान देण्याची तयारी करत असलेल्या आम आदमी पक्षाला छत्तीसगडमध्ये मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाचे छत्तीसगडमधील प्रदेशाध्यक्ष कोमल हुपेंडी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्या नेत्यांमध्ये आनंद प्रकाश गिरी आणि रवींद्र सिंह यांच्याही नावाचा समावेश आहे.
कोमल हुपेंडी यांच्यासोबत पक्षाच्या सहा सदस्यांनीही राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या मते सर्वजण पक्षावर नाराज आहेत. या नाराजीमागचं कारण आपचा इंडिया आघाडीमधील प्रवेश हे असल्याचं सांगितलं जात आहे. राजीनामा देणाऱ्या नेत्यांमध्ये आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कोमल हुपेंडी, प्रदेशउपाध्यक्ष आनंद प्रकाश मिरी, प्रदेश सचिव विशाल केळकर, प्रदेशाध्यक्ष युथ विंग रवींद्र सिंह ठाकर, प्रदेशाध्यक्ष एससी विंग धरम भार्गव, प्रदेशाध्यक्ष ओबीसी विंग कमलकांत साहू, प्रदेशाध्यक्ष एसटी विंग बसंत कुमार.
आम आदमी पक्षाने छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत खूप मेहनत घेतली होती. मात्र त्यांना एका जागेवरही कब्जा करता आला नव्हता. या विधानसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष कोमल हुपेंडी यांनी भानूप्रतापपूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता.