Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 11:59 AM2024-05-07T11:59:00+5:302024-05-07T12:06:43+5:30
Akhilesh Yadav And BJP : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल यादव यांनी मैनपुरीमध्ये मतदान केलं. मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधला.
उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यात राज्यातील लोकसभेच्या दहा जागांवर मतदान होत आहे. यावेळी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, दुसरीकडे उन्हाचा कडाका वाढला आहे. याच दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल यादव यांनी मैनपुरीमध्ये मतदान केलं आहे.
मतदान केल्यानंतर अखिलेश यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात. उन्हाळ्यात होणारे मतदान महिनाभर अगोदर होऊ शकतं. यावेळी त्यांनी मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन केलं. हे मतच आमचं आणि तुमचं आयुष्य बदलू शकतं.
"मी सर्व मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन करतो. या मतामुळे संविधान मजबूत होईल. जितकी जास्त मतं पडतील तितका लोकशाहीवरचा विश्वास वाढेल. हे मत जीवनात बदल घडवून आणतं. भाजपा सरकारमध्ये घोटाळा, फसवणूक आणि खोटेपणा याची गॅरेंटी आहे."
"ना शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट झाले आहे, ना रोजगार आहे, परीक्षे आधीच पेपर फुटतात. भाजपाला काही लोकांना नफा मिळवून द्यायचा आहे म्हणूनही महागाई आहे. सरकार बळाचा वापर करत असल्याची माहिती काही ठिकाणाहून येत आहे. मी स्वतः गाडीतून खाली उतरलो तेव्हा पोलीस कर्मचाऱ्याला भानच नव्हतं" असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.
मैनपुरीच्या विद्यमान खासदार आणि सपाच्या उमेदवार डिंपल यादव म्हणाल्या की, "बेरोजगारी आणि महागाई वाढत आहे. भाजपामध्ये धोरण आणि हेतूचा अभाव आहे. आज देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी निवडणूक आहे. राजकीय विचारसरणीचा हा लढा आहे."