गांधीनगरमधून अमित शाह यांचा 7 लाखहून अधिक मतांनी बंपर विजय, तर वाराणसीतून PM मोदींची विजयी हॅटट्रिक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 07:52 PM2024-06-04T19:52:05+5:302024-06-04T19:53:01+5:30
Lok Sabha Election 2024 : गांधीनगर येथून अमित शाह तब्बल ७,४४,७१६ मतांनी विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.
Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर होत आहेत. हे निकाल भाजप अथवा एनडीएच्या अपेक्षेप्रमाणे नसले तरी, गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघात अमित शाह यांनी कमाल केली आहे. येथून अमित शाह तब्बल ७,४४,७१६ मतांनी विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे या विजयासह त्यांनी स्वतःच स्वतःच्या विजयाचा विक्रम मोडला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांनी 5 लाख मतांनी विजय नोंदवला होता. यापूर्वी गांधीनगरमधून आडवाणी यांनी 4.83 लाख मतांनी विजय मिळवला होता. तसेच दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.
अमित शाह यांना किती मते मिळाली? -
गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघ हा गेल्या 35 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. अमित शह यांच्याआधी ही जागा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे होती. ही जागा भाजपची अत्यंत सुरक्षित जागा मानली जाते. अडवाणींनी या जागेवरून तब्बल ६ वेळा निवडून आले आहेत. तर अमित शाह 2019 पासून या जागेवरून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांनी गांधीनगरमधून दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत अमित शाह यांना एकूण 1010972 मते मिळाली आहेत. त्यांनी काँग्रेसच्या सोनल पटेल यांचा पराभव केला. त्यांना केवळ २६६२५६ मते मिळाली.
पंतप्रधा मोदींची हॅटट्रिक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांचा पराभव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 6 लाख 12 हजार 970 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांना 4 लाख 60 हजार 457 मते मिळाली आहेत. पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीमधून 1 लाख 52 हजार 513 मतांनी विजय नोंदवला आहे.
मोदींचा अनोखा विक्रम -
यापूर्वी, मोदी 2014 आणि 2019 मध्येही वाराणसीतून विजयी होत लोकसभेत पोहोचले होते. याच बरोबर, ते एकाच जागेवरून सलग तिसऱ्यांदा विजयी होणारे तिसरे पंतप्रधान ठरले आहेत. यापूर्वी हा विक्रम देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावर होता. नेहरू फूलपूर लोकसभा मतदारसंघातून तीनवेळा खासदार झाले होते. तर अटल बिहारी वाजपैयी हे लखनौ लोकसभा मतदारसंघातून पाचवेळा विजयी झाले होते.