Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 13:39 IST2024-05-17T13:32:03+5:302024-05-17T13:39:58+5:30
Arvind Kejriwal And Lok Sabha Election 2024 : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अमृतसरमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितलं की, "जेलमध्ये सीसीटीव्हीच्या माध्यमातून 24 तास त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे."

Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये राजकीय हालचाली जोरात सुरू आहेत. याच दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अमृतसरमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितलं की, "जेलमध्ये सीसीटीव्हीच्या माध्यमातून 24 तास त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे."
"मुख्यमंत्री भगवंत मान जेलमध्ये मला भेटायला यायचे. जेल प्रशासनाचे अधिकारी त्यांना जाळीच्या पलीकडे जाऊन भेटू देत. माझे इन्सुलिन बंद करण्यात आलं. माझी शुगर वाढली होती. मी ज्या कक्षात होतो तिथे दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. तिथे माझ्यावर पूर्ण नजर ठेवली जात होती. त्याचे एक प्रसारण पीएमओमध्ये होतं. तिथे हेही बघितलं जातं की केजरीवाल काय करत आहेत? जर 24 तास तुमच्यावर लक्ष ठेवलं जात असेल तर तुम्हाला कसं वाटेल?"
"पंजाब निवडणुकीसाठी 10 दिवसांपेक्षा कमी दिवस शिल्लक आहेत. तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. तुम्हाला लोकसभेच्या 13 पैकी 13 जागा जिंकायच्या आहेत. 2 जूनला सरेंडर करावं लागेल. मी पुन्हा जेलमध्ये जाईन. तेथे 4 जून रोजी, जेव्हा निकाल येत असतील, तेव्हा मी टीव्ही पाहेन. मला हे जाणून खूप आनंद होईल की आम आदमी पार्टी पंजाबमध्ये 13 पैकी 13 जागा जिंकेल."
"मला जेलमध्ये तुमची खूप आठवण आली. आज खासदार, आमदार, नगरसेवक सगळेच इथे हजर आहेत. जेलमधून बाहेर येताच मी संदीप पाठक यांना सांगितलं की मला माझ्या पंजाब आणि दिल्लीतील लोकांना भेटायचं आहे. कोणताही अजेंडा नाही. सर्वांना भेटायचं आहे. सर्वांना मिठी मारावीशी वाटते. भगवंत मान साहेब जेलमध्ये भेटायला यायचे. ते सांगायचे की सर्व लोक तुम्हाला मिस करत आहेत" असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.