निकालानंतर भाजपनं स्वतःला मित्रपक्षांपासून दूर केलं? NDAच्या बैठकीत या दोन पक्षांना नाही बोलावलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 12:50 PM2024-06-05T12:50:45+5:302024-06-05T12:51:57+5:30
Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशात भाजपचे चार मुख्य सहकारी पक्ष आहेत. या निवडणुकीत दोन सहकारी पक्षांचा त्यांच्या जागांवर पराभव झाला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ला मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर, आता बुधवारी दिल्लीमध्ये एनडीएची बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपने सर्व मित्रपक्षांना बोलावले आहे. मात्र, माध्यमांतील वृत्तांनुसार, भाजपने आपल्या दोन मित्रपक्षांपासून स्वतःला दूर ठेवले आहे. त्यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेले नाही.
उत्तर प्रदेशात भाजपचे चार मुख्य सहकारी पक्ष आहेत. या निवडणुकीत दोन सहकारी पक्षांचा त्यांच्या जागांवर पराभव झाला आहे. यातील, घोसी लोकसभा मतदारसंघात सुभासपाचे अरविंद राजभर यांना पराभवाचा सामना करावा लागला. ही जागा युती करून भाजपने सुभासपाला दिली होती. तर युतीतील निषाद पार्टीला भाजपने एकही जागा दिली नव्हती. मात्र, या पक्षाच्या प्रवीण निषाद यांना भाजपने संत कबीरनगरमधून उमेदवारी दिली होती.
स्वतःला मित्रपक्षांपासून दूर केलं -
मात्र प्रवीण निषाद यांचाही यावेळी पराभव झाला. ते या पूर्वी याच जागेवरून निवडून आले होते. यातच, सुभासपा आणि निषाद पार्टीकडे एकही खासदार नसल्याने त्यांना एनडीएच्या बैठकीत बोलावण्यात आले नसल्याचे समजते. माध्यमांनी सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या महातीनुसार, बुधवारी होणाऱ्या बैठकीसाठी भाजपकडून संजय निषाद आणि ओम प्रकाश राजभर यांना अद्याप एनजीएच्या बैठकीसाठी बोलावण्यात आलेले नाही.
या शिवाय, या निवडणुकीत आरएलडीकडून जयंत चौधरी आणि अपना दल एसच्या अनुप्रिया पटेल यांना बैठकीत बोलावण्यात आले आहे. या निवडणुकीत या दोन्ही पक्षांचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे त्यांना दिल्लीत होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप दुसऱ्या तर काँग्रेस तिसऱ्या स्थानावर आहे.