Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 10:24 AM2024-05-17T10:24:03+5:302024-05-17T10:36:53+5:30
Lok Sabha Election 2024 And BJP Narendra Modi : लोकसभा निवडणुकीत भाजपाने 400 हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. मात्र हे लक्ष्य नेमकं का आणि कसं ठरवण्यात आलं?, त्यामागचा मुख्य हेतू काय? या सर्व मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने 400 हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. मात्र हे लक्ष्य नेमकं का आणि कसं ठरवण्यात आलं?, त्यामागचा मुख्य हेतू काय? या सर्व मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजतकशी खास संवाद साधला आहे. '400 पार'चा नारा देत भाजपा कोणत्या रणनीतीने पुढे जात आहे, हेही यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
"एक कुटुंब नेहमीच प्रत्येक परीक्षेत आपल्या मुलाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करत असतं. जर एखाद्या कुटुंबातील मुलाने 90 गुण मिळवले तर त्याला पुढच्या वेळी 95 गुण मिळवण्यास सांगितलं जातं. जर मुलाला 99 गुण मिळाले तर त्याला सांगितले जाते की 100 गुण मिळवणे थोडे कठीण आहे, पण प्रयत्न करूया असं म्हटलं जातं."
"2019 च्या निवडणुकीनंतर आमच्याकडे आधीच एनडीए आणि एनडीए प्लसच्या रूपाने 400 जागा होत्या. मग एक नेता म्हणून त्यांना (युतीच्या सदस्यांना) सांगणं हे माझं कर्तव्य आहे की, आम्हाला यावेळी 400 च्या पुढे जायचं आहे" असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही भाष्य केलं आहे. रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, "आतापर्यंत आम्हाला वाटत होतं की आम्ही या युद्धापासून खूप दूर आहोत. त्याच्यापासून खूप दूर आहेत. डिप्लोमॅटीक भाषेत असं चालायचं. आम्ही समान अंतर राखायचो. मात्र आता जगात स्पर्धा सुरू झाली."