Bansuri Swaraj : निवडणूक प्रचारादरम्यान जखमी झाल्या बांसुरी स्वराज; डोळ्याला दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 11:40 AM2024-04-10T11:40:49+5:302024-04-10T11:56:33+5:30
Lok Sabha Election 2024 And Bansuri Swaraj : बांसुरी स्वराज या निवडणूक प्रचारादरम्यान जखमी झाल्या आहेत. त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली असून त्या पट्टी बांधून प्रचार करताना पाहायला मिळत आहेत.
भाजपाच्या नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बांसुरी स्वराज या निवडणूक प्रचारादरम्यान जखमी झाल्या आहेत. त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली असून त्या पट्टी बांधून प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. बांसुरी यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. याआधी चांदणी चौकातील भाजपाच्या उमेदवार प्रवीण खंडेलवाल यांनाही दुखापत झाली होती. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं पण तरी ते प्रचार करत आहेत.
बांसुरी स्वराज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. मंगळवारी निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली होती, त्यानंतर मोती नगर भागातील डॉक्टरांकडून उपचार घेतले. त्याबद्दल बांसुरी स्वराज यांनीही डॉक्टरांचे आभार मानले आहेत. डोळ्याला दुखापत होऊनही बांसुरी यांनी जनसंपर्क मोहीम राबवली. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी रमेश नगर परिसरातील सनातन धर्म मंदिरात आयोजित माता की चौकीमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. त्यांनी येथे दुर्गा मातेची पूजा केली.
Mildly injured my eye during campaigning today. Thank you Dr. Neeraj Varma ji of Moti Nagar, for taking care of me and patching me up. #pirateswag@BJP4Delhi@BJP4Indiapic.twitter.com/8lrNeneyyS
— Bansuri Swaraj (Modi Ka Parivar) (@BansuriSwaraj) April 9, 2024
भाजपाने मीनाक्षी लेखी यांचे कापलं तिकीट
भाजपाने नवी दिल्ली मतदारसंघातून विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांचं तिकीट रद्द करून माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील बांसुरी स्वराज यांना तिकीट दिलं आहे, त्यानंतर त्या सक्रिय झाल्या आहेत. तिकीट मिळाल्यानंतर बांसुरी स्वराज म्हणाल्या होत्या की, मला माझ्या आईची खूप आठवण येत आहे. तिच्या आशीर्वादाचा माझ्यावर वर्षाव होत आहे. माझ्या आईने केलेली भविष्यवाणी आज खरी ठरताना दिसत आहे की पंतप्रधान मोदी भाजपाच्या जाहीरनाम्यात लिहिलेले प्रत्येक वचन पूर्ण करतील.
दिल्लीतील सातही जागांवर सध्या भाजपाचे खासदार आहेत. त्यापैकी मनोज तिवारी वगळता सर्व खासदारांची तिकिटं कापली आहेत. यामध्ये चांदनी चौकातून डॉ. हर्षवर्धन यांचं तिकीट कापून प्रवीण खंडेलवाल, नवी दिल्लीतून मीनाक्षी लेखी यांचं तिकीट कापून बांसुरी स्वराज, पश्चिम दिल्लीतून प्रवेश वर्मा यांचं तिकीट कापून कमलजीत सहरावत, दक्षिण दिल्लीतून रमेश बिधुरी यांचं तिकीट कापून रामवीर सिंह, पूर्व दिल्लीतून गौतम गंभीरच्या जागी हर्ष मल्होत्रा आणि उत्तर-पश्चिम दिल्लीतून हंसराज हंस यांच्या जागी योगेंद्र चंदौलिया यांना तिकीट देण्यात आलं आहे.