ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 05:13 PM2024-05-02T17:13:43+5:302024-05-02T17:14:27+5:30
भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि कैसरगंजच्या उमेदवारांची घोषणा केली आहे.
Lok sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (BJP) गुरुवारी उमेदवारांची 17वी यादी जाहीर केली. या यादीत उत्तर प्रदेशातील बहुप्रतिक्षित रायबरेली आणि कैसरगंजच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहेत. भाजपने वादग्रस्त खासदार ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushansingh) यांचे पुत्र करणभूषण (Karan Bhushan) यांना कैसरगंज मतदारसंघातून तिकीट दिले आहे. तर, काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेलीतून दिनेश प्रताप सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून कैसरगंज मतदारसंघ भाजपसाठी डोकेदुखी ठरला होता. येथील विद्यमान खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर देशातील काही महिला कुस्तीपटूंनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे त्यांना परत उमेदवारी देणे भाजपवर उलटले असते. त्यामुळे त्यांची उमेदवारी जाणार, हे जवळपास निश्चित होते. आज अखेर ब्रिजभूषण यांच्याऐवजी त्यांच्या मुलाला तिकीट देण्यात आले.
#LokSabhaElections2024 | BJP nominates Dinesh Pratap Singh from Rae Bareli seat and Karan Bhushan Singh from Kaiserganj in Uttar Pradesh pic.twitter.com/xseZHPGPDq
— ANI (@ANI) May 2, 2024
विशेष म्हणजे रायबरेली हादेखील भाजपसाठी तितकाच महत्वाचा मतदारसंघ आहे. याचे कारण म्हणजे, हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून, येथे गेल्या अनेक दशकांपासून गांधी कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसने अद्याप या जागेसाठी आपला उमेदवार जाहीर केला नाही, पण प्रियंका गांधी यांना तिकीट मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत एक ताकदीचा उमेदवार देणे भाजपसाठी गरजेचे होते. आज अखेर रायबरेलीतून दिनेश सिंह यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
कोण आहेत करणभूषण सिंह?
13 डिसेंबर 1990 रोजी जन्मलेला करणभूषण सिंह डबल ट्रॅप नेमबाजीचे राष्ट्रीय खेळाडू राहिले आहेत. त्यांनी डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठातून बीबीए आणि एलएलबीचे शिक्षण घेतले, त्यानंतर ऑस्ट्रेलियातून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमाही केला. सध्या ते उत्तर प्रदेश कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आहेत. ही त्यांची पहिलीच निवडणूक आहे.
20 मे रोजी होणार मतदान
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी कैसरगंज लोकसभा जागेवर मतदान होणार आहे. 2019 च्या निवडणुकीत ब्रिजभूषण शरण सिंह यांनी ही जागा जिंकली होती. त्यांना 5,81,358 मते मिळाली. बसपाचे चंद्रदेव राम यादव यांना 3,19,757 तर काँग्रेसचे उमेदवार विनयकुमार पांडे यांना 3,7132 मते मिळाली. 2019 मध्ये सपा-बसपा एकत्र निवडणूक लढले होते.