‘मोदींची गॅरंटी’ हाच जाहीरनामा, निवडणुकीत महिला, तरुण, शेतकरी आणि गरिबांवर भाजप लक्ष केंद्रित करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 10:55 AM2024-04-02T10:55:11+5:302024-04-02T10:56:12+5:30
Lok Sabha Election 2024: भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी मोदींची गॅरंटी नावाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. या जाहीरनाम्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केलेल्या चार वर्गांवर शेतकरी, महिला, युवक आणि गरीब यांच्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
- संजय शर्मा
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी मोदींची गॅरंटी नावाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. या जाहीरनाम्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केलेल्या चार वर्गांवर शेतकरी, महिला, युवक आणि गरीब यांच्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, हा केवळ निवडणूक जाहीरनामा नसून २०४७ चा देशाचा रोड मॅपही असेल.
भाजपच्या निवडणूक जाहीरनामा समितीची पहिली बैठक केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात सोमवारी झाली. भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात मुद्दे समाविष्ट करण्यासाठी देशभरातील लाखो लोकांकडून मत मागविले होते. दोन महिन्यात भाजपला जाहीरनाम्यासाठी ३५ लाखांहून अधिक सूचना मिळाल्या आहेत.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मोदींची गॅरंटी हे भाजपच्या विजयाचे प्रमुख कारण असून, निवडणूक जाहीरनाम्याला मोदींची गॅरंटी असे नाव देण्यात यावे, असा या बैठकीतील सूर होता. जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणि कार्यावर विश्वास आहे, असेही अनेकांचे मत हाेते.
शेतकऱ्यांना सावकाराच्या जाचापासून मुक्त करणार
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाच्या दीडपट भाव देण्याच्या हमीबरोबरच त्यांना स्वस्त दरात कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे, पीक विम्याची हमी देणे आणि शेतकऱ्यांना सावकारांपासून मुक्त करण्याचे आश्वासनही देण्यात येणार आहे.
२०२९ पर्यंत गरिबांना मोफत रेशन मिळणार
२०२९ पर्यंत गरिबांना मोफत रेशनची योजना सुरू ठेवण्यात येणार आहे. सर्व गरिबांना कायमस्वरूपी घरे आणि १० लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा
अशी हमी या जाहीरनाम्यात दिली जाऊ शकते.
२०४७चे व्हिजन असेल समाविष्ट
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन आणि २०४७ पर्यंत देशाला पुढे नेण्याचे व्हिजन हे मोदी गॅरंटीमध्ये समाविष्ट केले जाणार आहे.
- २०४७ साठी देशाचा रोड मॅप काय असेल ते मुद्देही मोदींच्या गॅरंटीत असतील. आजच्या बैठकीत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन,
पीयूष गोयल, रविशंकर प्रसाद,विनोद तावडे यांच्यासह निवडणूक जाहीरनामा समितीच्या सर्व सदस्यांनी सहभाग घेतला.
- समितीची पुढील बैठक लवकरच बोलाविली जाण्याची शक्यता आहे.