भाजपा केरळ, तामिळनाडूत खातं उघडणार, दक्षिण भारतात एवढ्या जागा जिंकणार, ओपिनियन पोलचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 12:08 PM2024-03-05T12:08:30+5:302024-03-05T12:10:09+5:30
Lok Sabha Election 2024: नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका सर्व्हेमधून भाजपा दक्षिणेतील तामिळनाडू, केरळ आदी राज्यांमध्ये खातं उघडणार, तसेत दक्षिणेतील पाच राज्यांत लक्षणीय जागा जिंकणार, असा दावा करण्यात आला आहे.
सलग तिसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवून केंद्रातील सत्ता मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ३७० हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य मोदींनी समोर ठेवलं आहे. मात्र दक्षिण भारतामध्ये भाजपाचं स्थान नगण्य असल्याचा फटका मोदींना बसू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका सर्व्हेमधून भाजपा दक्षिणेतील तामिळनाडू, केरळ आदी राज्यांमध्ये खातं उघडणार, तसेत दक्षिणेतील पाच राज्यांत जोरदार मुसंडी मारणार, असा दावा करण्यात आला आहे.
इंडिया टीव्ही-सीएनएक्सने आगामी लोकसभा निवडणुकीबाबत देशव्यापी सर्व्हे करून त्यामधून विविध राज्यातील जनमताचा कौल प्रसिद्ध केला आहे. या ओपिनियन पोलमधून यावेळी दक्षिण भारतात भाजपा जोरदार मुसंडी मारणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. दक्षिण भारतात लोकसभेच्या एकूण १३० जागांपैकी ६० जागा इंडिया आघाडीला मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भाजपाला ३८ जागा मिळतील, अशी शक्यता या सर्व्हेमधून वर्तवण्यात आली आहे. तर इतरांच्या खात्यात ३२ जागा जातील असा दावा करण्यात आला आहे.
राज्यवार आढावा घेतल्यास या सर्व्हेनुसार कर्नाटकमधील २८ जागांपैकी २२ जागांवर भाजपाचा विजय होईल असा दावा करण्यात आला आहे. दोन जागांवर जेडीएस आणि ४ जागा काँग्रेसला मिळतील असे या सर्व्हेमध्ये म्हटले आहे. तर तेलंगाणामध्ये लोकसभेच्या १७ जागांपैकी ९ जागा काँग्रेसला, ५ जागा भाजपाला, २ जागा बीआरएसला आणि एका जागेवर एमआयएम विजयी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या ओपिनियन पोलनुसार तामिळनाडूमध्ये भाजपा यावेळी खाते उघडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तामिळनाडूमधील ३९ जागांपैकी २० जागांवर डीएमकेचा विजय होईल, तर काँग्रेस ६ जागांवर विजयी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर एआयएडीएमकेला ४ आणि भाजपाला ४ जागा मिळतील, असा दावा या सर्व्हेमधून करण्यात आला आहे. त्याबरोबरच इतरांना ५ जागा मिळतील असेही या सर्व्हेमध्ये म्हटले आहे. त्याबरोबरच पाँडेचेरीमधील एकमेव जागा भाजपाला मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.
या सर्व्हेत करण्यात आलेल्या दाव्यानुसार यावेळी केरळमध्येही भाजपाचं खातं उघडण्याची शक्यता आहे. केरळमधील लोकसभेच्या २० जागांपैकी भाजपाला ३ जागांवर विजय मिळू शकतो. तर यूडीएफ ११ आणि एलडीएफ ६ जागा जिंकण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या २५ जागांपैकी वायएसआर काँग्रेस १५ आणि तेलुगू देसम पक्ष १० जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर आंध्र प्रदेशात काँग्रेस आणि भाजपाचं मात्र खातं उघडणार नाही, असाही दावा या सर्व्हेमधून करण्यात आला आहे.