लोकसभा निवडणूक 2024 : भाजपाचे 17-18 फेब्रुवारीला 'महामंथन', हजारो नेत्यांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 21:59 IST2024-02-01T21:58:15+5:302024-02-01T21:59:26+5:30
या बैठकीसाठी सुमारे दहा हजार नेते सहभागी होणार आहेत.

लोकसभा निवडणूक 2024 : भाजपाचे 17-18 फेब्रुवारीला 'महामंथन', हजारो नेत्यांची उपस्थिती
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप 'महामंथन' करणार आहे. येत्या 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी राजधानी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत देशभरातील हजारो नेत्यांना बोलावण्यात आले असून, या सभेत पीएम मोदी 'विजयाचा मंत्र' देणार आहेत.
भाजपच्या या महत्त्वाच्या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांव्यतिरिक्त राष्ट्रीय परिषदेच्या सर्व सदस्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत खासदार (राज्यसभा आणि लोकसभा), आमदार, विधान परिषद सदस्य, माजी खासदारांनाही बोलावण्यात आले आहे. त्यात सर्व आघाड्यांचे राष्ट्रीय पदाधिकारीही सहभागी होतील.
तसेच, भारतीय जनता पक्षाच्या या बैठकीत पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, कोअर कमिटीचे सदस्य, शिस्तपालन समिती, वित्त समिती, निवडणूक समिती, माजी प्रदेशाध्यक्षही उपस्थित राहणार आहेत. या दोन दिवसीय बैठकीत लोकसभा क्लस्टर प्रभारी, लोकसभा प्रभारी, लोकसभा निमंत्रक आणि लोकसभा विस्तारक यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
याशिवाय, पक्षाचे सर्व राष्ट्रीय प्रवक्ते, राज्याचे मुख्य प्रवक्ते, राज्य माध्यम समन्वयक, राज्य सोशल मीडिया, आयटी समन्वयक, आघाडीचे प्रदेशाध्यक्ष व सरचिटणीस, सेलचे राज्य समन्वयक, देशभरातील सर्व जिल्हाध्यक्ष, महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायतींचे अध्यक्ष/उपाध्यक्ष, जिल्हा पंचायतींचे अध्यक्ष/उपाध्यक्ष, राज्यस्तरीय मंडळे आणि महामंडळांचे अध्यक्ष/उपाध्यक्ष यांनाही बैठकीत सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे.
धन्यवाद प्रस्ताव मंजूर केला जाईल
या दोन दिवसीय बैठकीसाठी दहा हजारांहून अधिक नेते सहभागी होणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची यंत्रणा सज्ज केली जाणार आहे. याशिवाय मोदी सरकारच्या कामगिरीवर ठराव मांडण्यात येणार आहे. राम मंदिर, कलम 370 यांसारख्या मुद्द्यांवर आश्वासने पूर्ण करणाऱ्या मोदी सरकारबद्दल आभार प्रस्ताव पारित करण्यात येणार आहे.