भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 06:32 AM2024-05-01T06:32:55+5:302024-05-01T06:33:25+5:30
'अब की बार, ३७० पार, एनडीए के साथ ४०० पार' अशी घोषणा देणारा भाजप पहिल्या दोन टप्प्यात कमी झालेल्या मतदानामुळे चिंतेत आहे.
संजय शर्मा
नवी दिल्ली: मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यात कमी मतदान झाल्यानंतर, 'सब का साथ, सब का विकास' याऐवजी थेट मुस्लिम तुष्टीकरणावर हल्ला करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. जेणेकरून हिंदू मतदार मतदानासाठी घराबाहेर पडतील. एवढेच नव्हे, तर निवडणुकीच्या सातही टप्प्यांसाठी वेगवेगळी रणनीती आखण्यात आली असून, निवडणुकांचे विविध मुद्दे मांडले जाणार आहेत.
'अब की बार, ३७० पार, एनडीए के साथ ४०० पार' अशी घोषणा देणारा भाजप पहिल्या दोन टप्प्यात कमी झालेल्या मतदानामुळे चिंतेत आहे. पहिल्या टप्प्यात सहा टक्क्यांहून कमी, तर दुसऱ्या टप्प्यातही चार टक्क्यांहून कमी मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. २०१९ मध्ये जिंकलेल्या ३०३ जागांसाठी किमान ६९ टक्के मतदान होणे आवश्यक आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकूण मतांपैकी ३८ टक्के मते मिळाली होती. तिसऱ्या टप्प्यातील बहुतांश जागा भाजपने यापूर्वी जिंकल्या जागा आहेत. ही बाब लक्षात घेता भाजपने आपल्या रणनीतीत बदल करण्याची योजना आखली आहे.
विरोधकांना लक्ष्य करण्यावर भर
■ पंतप्रधान नरेंद्र मोदी यापुढील सभांमध्ये सब का साथ, सब का विकास' यावर नाही, तर ते थेट मुस्लिमांवर टीका करणार आहेत.
■ भाजपचे इतर स्टार प्रचारक, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा हेदेखील मुस्लिम तुष्टीकरणाच्या मुद्यावर विरोधी पक्ष काँग्रेस आणि इतर पक्षांवर थेट हल्ला करतील.
■ काँग्रेस लोकांकडून त्यांची संपत्ती, सोने, चांदी, मंगळसूत्र हिसकावून घेऊन रोहिंग्यांना आणि घुसखोरांना देईल, असे पंतप्रधानही आपल्या भाषणात सतत सांगत आहेत.
मतदान वाढविण्यासाठी संघटना सक्रिय
मतदान वाढवण्यासाठी भाजपने आपली संघटना सक्रिय केली आहे. बूथ कमिटीच्या सदस्यांना घरोघरी मतदानाच्या चिठ्ठया वाटण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदारांना घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी स्वतंत्र तयारी करण्यात आली आहे.
● फ्लोटिंग व्होटरला (मतदानाबाबत निर्णय न घेतलेला मतदार) आकर्षित करण्यासाठी भाजपने रणनीतीत बदल केला आहे. संघटनेच्या जोरावर तिसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढतो की नाही, हे पाहायचे आहे.