देशात जातनिहाय जनगणना, बिहारला विशेष दर्जा अन्...; नितीश कुमारांचा जेडीयू तगडी 'सौदेबाजी' करण्याच्या तयारीत!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 09:09 PM2024-06-05T21:09:05+5:302024-06-05T21:11:39+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी नितीश कुमार बुधवारी दिल्लीत पोहोचले आहेत...
लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालानंतर किंगमेकरच्या भूमिकेत आलेला मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपसोबत तगडी सौदेबाजी करण्याच्या तयारीत आहे. जेडीयूने देशात जातनिहाय जनगणना आणि बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यासोबतच, केंद्रीय मंत्रिमंडळात किमान पाच मंत्रिपदांची मागणी केल्याचे वृत्त आहे. नितीश कुमार यांची केंद्रीय मंत्रिमंडळातील रेल्वे, ग्रामीण विकास आणि जलसंपदा, अशा महत्त्वाच्या मंत्रालयांवर नजर असल्याचेही बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी ते बुधवारी दिल्लीत पोहोचले आहेत.
जेडीयूच्या एका नेत्याच्या हवाल्याने लाइव्हहिंदुस्तान डॉट कॉमने दिलेल्या एका वृत्तानुसार, बिहारमधील विकासासाठी जेडीयू नेतृत्वाला केंद्रीय कॅबिनेटमध्ये काही महत्वाची मंत्रालये मिळावीत अशी अपेक्षा आहे. जेनेकरून बिहारचे इंफ्रास्ट्रक्चर आणखी मजबूत करण्याच्या कामाला वेग येईल.
संपूर्ण देशभरात जातनिहाय जनगणना -
लाइव्हहिंदुस्तानने दिलेल्या वृत्तानुसार, जेडीयूच्या आणखी एका नेत्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर म्हटले आहे की, "बिहारमधील जातनिहाय जनगणनेचे मॉड्यूल संपूर्ण देशात लागू करण्याची मुख्यमंत्री नितीश कुमार यांची इच्छा आहे. केंद्र सरकारकडून देशभरात जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी जेडीयू आग्रही असणार आहे. जेणेकरून गरीब आणि मागास समाजाला मुख्य प्रवाहात आणता येईल."
बिहारला विशेष राज्याचा दर्जा -
याशिवाय, जेडीयू बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठीही आग्रही असणार आहे. यासंदर्भात बोलताना जेडीयू एमएलसी खालिद अन्वर यांनी म्हटले आहे की, बिहारच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे. यामुळे विशेष राज्याचा दर्जा आणि केंद्राकडून मोठा फंड मिळावा, अशी जेडीयूची इच्छा आहे.
यावेळच्या लोकसभा निवडणुकीत, एनडीएला एकूण २९२ जागा मिळाल्या आहेत. यांपैकी भाजपला एकट्याला २४० जागा मिळाल्या आहेत. अर्थात भाजपला एकट्याला बहुमत (२७२) मिळवता आले नाही. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांची आवश्यकता आहे. अशा स्थितीत 12 जागा जिंकणारे जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.