लोकसभेची जागा मागणाऱ्या मित्रपक्षाला भाजपा दूर करणार; हरियाणात सरकार बदलणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 11:16 AM2024-03-12T11:16:59+5:302024-03-12T11:17:48+5:30
भाजपा जेजेपीला जागा सोडण्यास तयार नाही. हरियाणातील सर्व १० जागांवर भाजपा उमेदवार देणार आहे
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणात भाजपा मोठी खेळी खेळणार आहे. हरियाणातील भाजपा-जननायक जनता पार्टीचे सरकार कोसळण्याच्या स्थितीत आहे. हरियाणा सरकारचं मंत्रिमंडळ आज सामुहिक राजीनामा देऊ शकते. त्यानंतर हरियाणात पुन्हा नवीन मंत्रिमंडळ बनवण्यात येईल. हरियाणात आता भाजपा आणि जननायक जनता पार्टी यांची आघाडी तुटली असं बोललं जात आहे.
हरियाणामध्ये भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक दुपारी १२ वाजता बोलावण्यात आली आहे. या बैठकीत अर्जुन मुंडा आणि तरुण चौक निरिक्षक म्हणून सहभागी होतील. काही वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांना भेटल्याची बातमी आली होती. यावेळी लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा होणार होती. त्यात जेजीपी भाजपाकडे १ ते २ लोकसभा जागांची मागणी करत होते. याआधीही सोमवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांची दुष्यंत चौटाला यांनी भेट घेतली पण निवडणुकीत आघाडीबाबत काही निर्णय झाला नाही.
सूत्रांनुसार, भाजपा जेजेपीला जागा सोडण्यास तयार नाही. हरियाणातील सर्व १० जागांवर भाजपा उमेदवार देणार आहे. परंतु त्यातील एकही जागा मित्रपक्ष जेजेपीला सोडण्यास तयार नाही. त्यातच हरियाणातील अपक्ष आमदार नयन पाल रावत यांनी सांगितले की, मी मुख्यमंत्री खट्टर यांची भेट घेतली. आम्ही आधीपासून मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर आमची चर्चा झाली. जेजेपीसोबतची आघाडी तुटण्याची सुरुवात झालीय असं त्यांनी म्हटलं होते.
हरियाणा विधानसभेतील स्थिती
भाजपा - ४१
भाजपासोबत असलेले अपक्ष ६
हरियाणा लोकहित पार्टी - १ ( भाजपाला पाठिंबा)
जेजेपी वेगळे झाल्यास भाजपाला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या ४८
बहुमतासाठी लागणारा आकडा - ४६
विरोधी पक्षात कोण?
जेजेपी - १०
अपक्ष - १
इंडियन नॅशनल लोकदल - १
काँग्रेस - ३०