Survey: आज निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? NDA की INDIA? समोर आला धक्कादायक कौल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 08:29 PM2023-08-24T20:29:10+5:302023-08-24T20:29:56+5:30
Lok sabha Election 2024: आज जर लोकसभेची निवडणूक झाली तर कोण बाजी मारणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. देशात आज निवडणूक झाली तर कोण बाजी मारेल, याबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला आता अगदी काही महिन्यांचाच अवधी राहिला आहे. एकीकडे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा सलग तिसऱ्यांदा बाजी मारून केंद्रातील सत्ता मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे. तर दुसरीकडे काँग्रेससह देशातील बहुतांश भाजपाविरोधा पक्षांनी एकत्र येत विरोधकांच्या इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज जर लोकसभेची निवडणूक झाली तर कोण बाजी मारणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
दरम्यान, आज प्रसिद्ध झालेल्या इंडिया टुडे-सी वोटरच्या सर्वेमधून देशात आज निवडणूक झाली तर कोण बाजी मारेल, याबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार आज निवडणूक झाल्यास भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि विरोधी पक्षांची इंडिया आघाडी यांच्यात अटीतटीची लढाई होण्याची शक्यता आहे. या सर्वेमधील आकडेवारीनुसार आज निवडणूक झाल्यास भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला ४३ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडी जोरदार मुसंडी मारणार असल्याचा अंदाज असून इंडिया आघाडीला ४१ टक्के मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांच्या खात्यात १६ टक्के मतं जाण्याची शक्यता आहे. पक्षनिहाय मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास भाजपाला ३८ टक्के, काँग्रेसला २० टक्के आणि इतर पक्षांना ४२ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे.
मतांच्या टक्केवारीचं जागांमध्ये रूपांतर केल्यास भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीला ३०६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर विरोधकांच्या इंडिया आघाडीला १९३ जागांपर्यंत मजल मारता येण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांच्या खात्यात ४४ जागा जातील. पक्षनिहाय जागांचा विचार केल्यास यावेळी भाजपाला तीनशेच्या आतच जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपाला २८७ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला ७४ आणि इतर पक्षांच्या खात्यात तब्बल १८२ जागा जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भ्रष्टाचाराच्या मुद्यावर मत मांडताना सर्वेमध्ये सहभागी झालेल्या ५४ टक्के लोकांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचार कमी झाल्याचे म्हटले आहे. तर ४१ टक्के लोकांनी भ्रष्टाचार कमी झाला नसल्याचं म्हटलं आहे. याच सर्वेमध्ये भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय का? असा प्रश्न विचारण्यात आला असता तब्बल ४५ टक्के लोकांनी होय असं उत्तर दिलं आहे. तर ३८ टक्के लोकांनी तसा दुरुपयोग होत नसल्याचं म्हटलं आहे.