महाराष्ट्रात क्लीन स्विप होणार, पण कोण करणार? मविआ की महायुती, सर्व्हेतून समोर आली धक्कादायक आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 10:11 PM2024-03-14T22:11:42+5:302024-03-14T22:18:07+5:30
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध संस्थाचे ओपिनियन पोल समोर आले आहेत. दरम्यान, देशातील राजकीय वर्तुळाचं सर्वाधिक लक्ष हे महाराष्ट्राकडे लागले आहेत. राजकीय उलथापालथी, फोडाफोडी आणि विविध आंदोलनं यामुळे गाजत असलेल्या महाराष्ट्रातील मतदार काय कौल देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध संस्थाचे ओपिनियन पोल समोर आले आहेत. दरम्यान, देशातील राजकीय वर्तुळाचं सर्वाधिक लक्ष हे महाराष्ट्राकडे लागले आहेत. राजकीय उलथापालथी, फोडाफोडी आणि विविध आंदोलनं यामुळे गाजत असलेल्या महाराष्ट्रातील मतदार काय कौल देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, न्यूज १८ ने प्रसिद्ध केलेल्या ओपिनियन पोलमधून महाराष्ट्राबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या ओपिनियन पोलनुसार राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती जोरदार मुसंडी मारणार असून, महाविकास आघाडीला हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्या जागांवर समाधान मानावे लागेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या ओपिनियन पोलनुसार लोकसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीला ४८ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला ३४ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. इतरांना १३ टक्के मतं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मतांच्या टक्केवारीचं जागांमध्ये रूपांतर केल्यास महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या ४८ जागांपैकी महायुतीला ४१ जागा मिळतील, असा अंदाज या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला केवळ ७ जागांवर समाधान मानावे लागू शकते.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्येही भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला ४१ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. मात्र नंतर शिवसेनेने भाजपाशी असलेली युती मोडली होती. तर तेव्हाच्या महाआघाडीमधील काँग्रेसने १ तर राष्ट्रवादी काँग्रेसने ४ जागा जिंकल्या होत्या. एमआयएमने एक तर अपक्षांच्या खात्यात एक जागा गेली होती.