इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 16:54 IST2024-05-07T16:53:25+5:302024-05-07T16:54:06+5:30
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील नेते आणि आरजेडीचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी मुस्लिमांना संपूर्ण आरक्षण मिळालंच पाहिजे असं विधान केलं होतं. त्यावरून आता भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील नेते आणि आरजेडीचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी मुस्लिमांना संपूर्ण आरक्षण मिळालंच पाहिजे असं विधान केलं होतं. त्यावरून आता भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. लालू प्रसाद यादव यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत दिलेल्या विधानामुळे सत्तेवर आल्यास इंडिया आघाडी घटनेच्या मूळ चौकटीत बदल करून अल्पसंख्याक समाजाला आरक्षण देईल, हे स्पष्ट झाले आहे, असा आरोप भाजपाने केला आहे.
याबाबत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, मुस्लिमांना संपूर्ण आरक्षण मिळालं पाहिजे, असं विधान लालू प्रसाद यादव यांनी केलं आहे. त्यांच्या विधानामध्ये वापरण्यात आलेला पूर्णच्या पूर्ण हा शब्द खूप गंभीर आहे. त्यामुळे इंडिया आघाडी अनुसूचित जाती आणि मागास वर्गाच्या वाट्यामधून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा विचार करत आहे, हे स्पष्ट होतेय.
सुधांशू त्रिवेदी पुढे म्हणाले की, घटनेमध्ये बदल करून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गाच्या वाट्यामधून मुस्लिमांना आरक्षण देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाकडून व्यक्त करण्यात येत असलेली शंका लालूप्रसाद यादव यांच्या विधानामुळे सत्य असल्याचे दिसत आहे. यामधून आरजेडी मुस्लिमांना प्राधान्य देत असून, त्यांच्यासाठी यादव दुय्यम झाले असल्याचे दिसत आहे, असा टोलाही त्रिवेदी यांनी लगावला.
धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही, असे घटनेमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी घटनेच्या मुळ चौकटीत बदल करण्याचा इंडिया आघाडीचा इरादा आहे. असा आरोपही त्रिवेदी यांनी केला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही एका प्रचारसभेला संबोधित करताना लालू प्रसाद यादव यांच्यावर नाव न घेता टीका केली. ज्यांना चारा खाल्ला ते तुरुंगातून बाहेर आले आहेत. आता ते मुस्लिमांसाठी आरक्षण देण्याच्या बाता मारत आहेत, अशी टीका मोदींनी केली.