केजरीवालांसाठी ‘इंडिया’ची वज्रमूठ, दिल्लीत पार पडली ‘तानाशाही हटाओ, लोकतंत्र बचाओ’ महारॅली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 06:53 AM2024-04-01T06:53:39+5:302024-04-01T06:54:12+5:30
Lok Sabha Election 2024: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची एकजूट रविवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर दिसली.
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची एकजूट रविवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर दिसली. ‘देशात लोकशाही हवी की हुकुमशाही?’ ‘अब की बार, भाजप तडीपार‘, ‘तुम तो धोकेबाज हो, वादा कर के भाग जाते हो’, ‘मोदी की गॅरंटी, झीरो वॉरंटी’, ‘मॅच फिक्सिंगद्वारे भाजपने निवडणूक जिंकून संविधान बदलले तर देशात आगडोंब उसळेल’, अशी शरसंधाने करीत विरोधकांनी केंद्रातील भाजप सरकारविरोधात तीव्र निषेधाचा हुंकार भरला.
मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानातील ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या समारोपीय सभेनंतर दोन आठवड्यांनीच रविवारी दिल्लीत आम आदमी पार्टीने आयोजित केलेल्या ‘तानाशाही हटाओ, लोकतंत्र बचाओ’ महारॅली पार पडली. आघाडीतील सर्व २८ पक्षांच्या नेत्यांसह दिल्ली व हरयाणातील काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते व्यासपीठावर होते. तीन तास चाललेल्या या रॅलीत सर्वच वक्त्यांनी विरोधी पक्षनेत्यांवरील सूडबुद्धीच्या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला.
‘इंडिया’ची पाच सूत्री मागणी
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाला समान संधी द्यावी. निवडणूक जिंकण्यासाठी तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांवर केल्या जाणाऱ्या कारवाया आयोगाने थांबवाव्यात. हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांची तातडीने सुटका करावी. निवडणूक काळात विरोधी पक्षांवर आर्थिक बंधने आणणाऱ्या कारवाया थांबविण्यात याव्यात. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपद्वारे केली जाणारी वसुली, मनी लॉण्ड्रिंग आदींच्या आरोपांच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत एसआयटीची स्थापना करण्यात यावी.
‘एका पक्षाचे सरकार देशासाठी धोकादायक’
- भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी देशवासीयांना ‘अब की बार, भाजप तडीपार’ अशीच शपथ घ्यावी लागेल, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. चारशे पारचे स्वप्न पाहणारी एक व्यक्ती आणि एका पक्षाचे सरकार देशासाठी धोकादायक बनले असून, मजबूत देशासाठी संमिश्र सरकार हाच उपाय आहे.
- यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या भाजपमध्ये हिंमत असेल तर ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे आमचे मित्रपक्ष असल्याचे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.
अटकेतील नेत्यांच्या पत्नी व्यासपीठावर
ईडीच्या कारवाईमुळे अटकेत असलेले केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी या महारॅलीत हुकुमशाहीविरुद्ध जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. याशिवाय खासदार संजय सिंह यांच्या पत्नी अनिता, माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्या पत्नी पूनम याही व्यासपीठावर उपस्थित होत्या.
सामन्यापूर्वीच खेळाडूंना तुरुंगात टाकले
- पंतप्रधान मोदी मॅच फिक्सिंगने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे अवघा देश बघत आहेत. पंचांवर दबाव टाकून, खेळाडू विकत घेऊन बेईमानीने सामना जिंकण्याचा प्रयत्न करीत आहेत.
- निवडणूक आयोगातील दोन पंच त्यांनीच निवडले. सामना सुरू होण्यापूर्वी आमच्या संघातील दोन खेळाडूंना अटक करून तुरुंगात टाकले, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी केली.
तृणमूल ‘इंडिया’तच
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधित्व करताना डेरेक ओब्रायन यांनी तृणमूल काँग्रेस ‘इंडिया’ आघाडीतच असल्याची ग्वाही दिली. केजरीवाल आणि सोरेन यांच्या अटकेचा निषेध करणारे मुख्यमंत्री ममता बनर्जी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे भाषण वाचून दाखविण्यात आले.
‘लोकशाही नव्हे, ही सभा कुटुंब वाचवण्यासाठी’
मेरठ (उत्तर प्रदेश) : विरोधकांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर लोकशाही वाचविण्यासाठी सभा घेतल्याचे म्हटले जाते, परंतु ती सभा लोकशाही नव्हे, तर कुटुंब वाचवण्यासाठी सभा घेतल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर मेरठ येथे आयोजित पहिल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
ही निवडणूक दोन गटांतील लढाई आहे. एका बाजूला तुमचा एनडीए भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कटिबद्ध आहे, तर दुसरीकडे भ्रष्ट नेत्यांच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करणारी ‘इंडिया’ आघाडी आहे. भ्रष्टाचार हटवायचा की नाही हे तुम्हाला ठरवायचे आहे. ज्यांनी लूट केली आहे, ती देशाला परत द्यावी लागेल, ही मोदींची ‘गॅरंटी’ आहे”, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.