'वेळ आल्यावर...', लोकसभा निवडणुकीत भाजप-जेडीएस युतीवर कुमारस्वामींची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 09:06 PM2023-06-12T21:06:08+5:302023-06-12T21:06:53+5:30
Lok Sabha Elections: जेडीएस प्रमुखांनी दिल्ली दौरा केल्यानंतर भाजपसोबत युती करण्याची चर्चा सुरू झाली आहे.
Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे, पण यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाड्या आणि युत्यांच्या चर्चा होत आहेत. यातच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी भाजपसोबत युती करण्याची चर्चा जोर धरत आहे. यावर आज (12 जून) स्वतः कुमारस्वामींनी स्पष्टीकरण दिले आहे.
एचडी कुमारस्वामी म्हणाले की, सध्या त्यांच्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाही. भाजप आणि जेडीएस यांच्यातील संभाव्य युती आणि निवडणूक लढवण्याबद्दलच्या शक्यतेवर ते म्हणाले, राजकारणात अनेक गोष्टी आणि चर्चा होत असतात. यातील काही अफवा असतात तर काही सत्य असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे निवडणूक जवळ आल्यावर मिळतील. सध्यातरी लोकसभा निवडणुकीसाठी कोणासोबतही करार झालेला नाही, वेळ आल्यावर निर्णय घेतला जाईल.
इतर पक्षांसोबत युती करणार का, असे विचारले असता ते म्हणाले, बघू, जेव्हा तशी परिस्थिती निर्माण होईल, तेव्हा निर्णय घेऊ. सध्या आम्ही सर्व विजयी-पराभूत आमदारांसोबत बैठक घेत आहोत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कुमारस्वामी यांनी दिल्ली दौरा केला, त्यानंतर भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्या.