12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 04:20 PM2024-05-15T16:20:55+5:302024-05-15T16:21:37+5:30
कंगनाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथ पत्राच्या माध्यामाने तिच्या संपत्तीसंदर्भातील माहितीही समोर आली आहे. उमेदवारी अर्जासोबतच दाखल केलेल्या शपथपत्रात तिने आपल्या संपत्तीसंदर्भात माहिती दिली आहे.
बॉलीवुड अभिनेत्री तथा भाजप उमेदवार कंगना रणौतने हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कंगनाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथ पत्राच्या माध्यामाने तिच्या संपत्तीसंदर्भातील माहितीही समोर आली आहे. उमेदवारी अर्जासोबतच दाखल केलेल्या शपथपत्रात तिने आपल्या संपत्तीसंदर्भात माहिती दिली आहे.
कंगनाने शपथपत्रात दिलेल्या महातीनुसार, तिच्याकडे एकूण 91 कोटी 50 लाख रुपयांची चल-अचल संपत्ती आहे. यात एकूण 28.73 कोटी रुपयांची चल संपत्ती आहे. तर 62.92 कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. महत्वाचे म्हणजे, कंगनाकडे एलआयसीच्याही 50 पॉलिसी आहेत. यात दहा-दहा लाख रुपयांच्या 49 पॉलिसी आहेत. तर पाच लाख रुपयांची एक पॉलिसी आहे. महत्वाचे म्हणजे या सर्व पॉलिसी तिने एकाच दिवसात म्हणजेच 4 जून, 2008 रोजी घेतल्या आहेत. याशिवाय कंगनाने 1.20 कोटी रुपयांचे कॅपिटल इनवेस्टमेंट देखील केले आहे.
कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे आणि सोनं -
कंगनाने तिच्या निवडणूक शपथपत्रात आपण 12वी पास असल्याचे म्हटले आहे. कंगनाकडे अनेक सोन्या-चांदीचे दागिने आहेत. तिच्याकडे 6 किलोहून अधिक सोने आहे. या सोन्याची किंमत पाच कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. कंगनाकडे 3 कोटींचे हिरेही आहेत. याशिवाय तिच्याकडे 50 लाख रुपयांची साठ किलो चांदीही आहे.
महागड्या वाहनांपासून स्कूटरही -
कंगनाला महागडी वाहनंही आवडतात. सध्या त्याच्याकडे दोन मर्सिडीज आहेत. तिच्याकडे 58 लाख रुपयांची मर्सिडीज बेंझ आणि 3.91 कोटी रुपयांची मर्सिडीज मेबॅक आहे. याशिवाय तिच्याकडे 98 लाख रुपयांची बीएमडब्ल्यू कार आणि 53 हजार रुपयांची व्हेस्पा स्कूटरही आहे. एवढेच नाही तर, कंगनाने तिच्या नातलगांनाही कोट्यवधी रुपये कर्जाच्या म्हणूनही दिले आहे.