खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 11:40 AM2024-05-11T11:40:21+5:302024-05-11T11:41:28+5:30
Lok Sabha Election 2024: रासुका अंतर्गत सध्या आसाममधील दिब्रुगड येथील कारावासात बंद असलेला खलिस्तान समर्थक नेता अमृतपाल सिंह (Amritpal Singh) लोकसभेच्या निवडणुकीत उतरला आहे. अमृतपाल सिंग याने खडूर साहीब लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
रासुका अंतर्गत सध्या आसाममधील दिब्रुगड येथील कारावासात बंद असलेला खलिस्तान समर्थक नेता अमृतपाल सिंह लोकसभेच्या निवडणुकीत उतरला आहे. अमृतपाल सिंग याने खडूर साहीब लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अमृतपाल सिंग याने दाखल केलेल्या शपथपत्रामधून त्याच्याजवळ केवळ १ हजार रुपयांची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे.
अमृतपालने दिब्रुगडमधील तुरुंगात आपला उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर अमृतपालच्यावतीने त्याच्या काकांनी ततनतारन जिल्ह्यात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याने दिलेल्या शपथपत्रानुसार अमृतपालसिंगकडे अमृतसरमधील स्टेट बँकेच्या एका खात्यामध्ये १ हजार रुपये रक्कम आहे. याशिवाय आपल्याकडे कुठलीही स्थावर किंवा जंगम मालमत्ता नाही, असे अमृतपालने या शपथपत्रामध्ये म्हटले आहे.
अमृतपालसिंगने शपथपत्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार त्याच्याविरोदात १२ गुन्हे दाखल आहेत. मात्र एकाही प्रकरणात त्याला अद्याप दोषी ठरवण्यात आलेले नाही. अमृतपाल सिंग हा मॅट्रिकपर्यंत शिकलेला आहे. २००८ मध्ये त्याने अमृतसरमधील फेरुमनमधील एका शाळेतून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली होती. अमृतपाल सिंह त्याच्या काही सहकाऱ्यांसह गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून तुरुंगात आहे. दरम्यान पंजाबमधील १३ लोकसभा मतदारसंघात १ जून रोजी मतदान होणार आहे, त्याच दिवशी त्याच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे.