निकालाआधीच दिल्लीत हालचालींना वेग! नितीश कुमार यांनी पीएम मोदींची घेतली भेट, अमित शहा यांचीही भेट घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 03:04 PM2024-06-03T15:04:22+5:302024-06-03T15:06:39+5:30
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील सात टप्प्यातील मतदान संपले आहे. उद्या ४ जून रोजी निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत.
Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीतील सात टप्प्यातील मतदान संपले आहे. उद्या ४ जून रोजी निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत. दरम्यान, आता निकालाआधीच दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. आता अमित शाह यांची भेट घेणार आहेत.
नितीश कुमार यांच्या भेटीमागचे कारण अजुनही समोर आलेले नाही. विशेष पॅकेजची मागणी करत नितीश कुमार दिल्लीत पोहोचल्याचे जेडीयूकडून सांगण्यात येत आहे.
नितीश कुमार आता केंद्रीय राजकारणात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. कारण यावेळी एक्झिट पोलमध्ये जेडीयूची कामगिरी काहीशी निराशाजनक दिसत आहे. अशा स्थितीत नितीश कुमार आता केंद्रीय राजकारणाचा विचार करत आहेत की काय, असंही बोलले जात आहे.
नितीश कुमार यांच्या भेटीदरम्यान जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते केसी त्यागी यांचे वक्तव्य समोर आले आहे. ते म्हणाले, 'ते संस्थापक सदस्यांमध्ये आहेत, वाजपेयी, अडवाणी आणि जॉर्ज साहेबांनी मिळून एनडीएची स्थापना केली, त्यावेळी जेडीयूही होती. आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. बिहारमध्ये एनडीए ज्या जागा जिंकत आहे, त्यात मोदीजींसोबत नितीशकुमार यांचाही महत्त्वाचा वाटा आहे. निवडणुकीचे विषय आणि मुद्दे मांडण्यासाठी त्यांची बैठक आहे.
केसी त्यागी म्हणाले, आमच्याकडे असलेल्या ग्राउंड रिपोर्ट्सनुसार एनडीएची कामगिरी चांगली आहे. मला या संपूर्ण निवडणुकीत कुठेही व्हीपी सिंगसारखा विरोधी नेता दिसला नाही, ना जयप्रकाशसारखा प्रभावशाली नेता दिसला, ना या निवडणुकीत सत्ताविरोधी लाट दिसली. इंडिया आघाडीचे नेतृत्व नव्हते, जनता प्रश्न विचारायची की मोदी नाही तर दुसरे कोण, इंडिया आघाडीकडे नेता नव्हता. पंतप्रधान सभा घेतात की काही कामे करतात, असा प्रश्न विरोधी पक्षांनी उपस्थित करू नये, असंही ते म्हणाले.