कितीही पक्ष एकत्र आणले तरी माेदीच येतील, अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 12:33 PM2024-04-02T12:33:15+5:302024-04-02T12:33:57+5:30
Lok Sabha Election 2024: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लोकशाहीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. कारण, त्यांच्या आजी व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात लाखो लोकांना तुरुंगात टाकले होते व राजकीय पक्षांवर बंदी घातली होती, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सोमवारी येथे केला.
जोधपूर - काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकशाहीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. कारण, त्यांच्या आजी व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात लाखो लोकांना तुरुंगात टाकले होते व राजकीय पक्षांवर बंदी घातली होती, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी येथे केला. रविवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या जाहीर सभेवरून ‘इंडिया’ आघाडीला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, “तुम्ही कितीही पक्ष एकत्र आणले तरी मोदीच येतील.”
जोधपूर येथील शक्ती केंद्र प्रमुख संमेलनाला संबोधित करताना शाह बोलत होते. जो कोणी भ्रष्टाचारात गुंतेल तो तुरुंगात जाईल. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून देण्यासाठी देशातील जनता सज्ज झाली असून, त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल, असेही
ते म्हणाले.
इंडिया आघाडीवर टीकास्त्र सोडताना ते म्हणाले, काल जमलेली ही मंडळी म्हणाली, लोकशाही वाचवा. का बाबा, लोकशाहीला काय झालंय? या देशातील जनता मतदान करणार आहे. आमचे नेते तुरुंगात गेले, असा गलका ते करताहेत. बंधू, १२ लाख कोटींचा घोटाळा कराल तर तुरुंगात जाणार नाही तर काय.” पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’ करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप राहुल गांधींनी कालच्या सभेत केला होता. शाह पुढे म्हणाले, “ऐका.. तुम्ही का तक्रार करताय? आम्ही २०१४ आणि २०१९ मध्येही ‘जो कोणी भ्रष्टाचार करेल तो तुरुंगात जाईल’ असे म्हणत निवडणूक लढवली होती.”
जेडीएस नेते शाह यांना देणार माहिती
कर्नाटकच्या विविध मतदारसंघांतील परिस्थितीचा अभिप्राय आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देणार आहोत, असे जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी मंगळवारी राज्य भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीत सांगितले.
उभय पक्षांतील अविश्वासाचे वातावरण कमी करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, असे मानले जाते. उभय पक्षांतील जागावाटप करारानुसार भाजप राज्यात २५ जागांवर, तर जेडीएस तीन जागांवर निवडणूक लढवणार आहे.