‘आता कदाचित पक्षाला…’ कंगनाला उमेदवारी दिल्यावर चार वेळच्या भाजपा खासदाराने व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 02:30 PM2024-03-25T14:30:17+5:302024-03-25T14:31:25+5:30
Lok Sabha Election 2024: भाजपाने (BJP) हिमाचल प्रदेशमधील मंडी या लोकसभा मतदारसंघातून (Mandi Lok sabha Constituency) अभिनेत्री कंगना राणावत (Kangana ranaut) हिला उमेदवारी जाहीर केली आहे. कंगनाच्या उमेदवारीमुळे हिमाचल प्रदेशमधील अनेक इच्छुकांना धक्का बसला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या उमेदवारी यादीमधून भाजपाने धक्कातंत्राचा अवलंब करत अनेक ठिकाणी अनपेक्षित नावं समोर आणली आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेवर शिक्कामोर्तब करत भाजपाने हिमाचल प्रदेशमधील मंडी या लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना राणावत हिला उमेदवारी जाहीर केली आहे. कंगनाच्या उमेदवारीमुळे हिमाचल प्रदेशमधील अनेक इच्छुकांना धक्का बसला आहे. दरम्यान, कंगनाला उमेदवारी दिल्यानंतर चार वेळा भाजपाचे खासदार राहिलेल्या महेश्वर सिंह यांनी खंत व्यक्त केली आहे.
भाजपाचे माजी खासदार महेश्वर सिंह यांनी विचारांच्या राजकारणाची विचारसरणी बदललीय या माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांनी केलेल्या विधानाला पाठिंबा दिला आहे. कुल्लूमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले महेश्वर सिंह म्हणाले की, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने कंगना राणावतला उमेदवारी दिली आहे. त्यासाठी तिला शुभेच्छा. सर्व काही पाहूनच उमेदवारी देण्याचा निर्णय झाला असावा, पक्षाने उमेदवारी देण्यासाठी सर्व्हेही केला होता. त्यात कंगना आमच्या पुढे राहिली असेल. आम्ही कुठे तरी मागे पडलो असण्याची शक्यता आहे.
महेश्वर सिंह यांनी पुढे सांगितले की, आधी आमचा पक्ष लहान होता. तेव्हा लहान पातळीवर चर्चा व्हायच्या. आता पक्षाचं कुटुंब वाढलं आहे. त्यामुळे पक्षा अधिक सखोल पातळीवर सर्व्हे करण्यात येतो. त्यात जो उमेदवा योग्य वाटतो, त्याला उमेदवारी दिली जाते. आता आम्हाला कुठलीही खंत नाही आहे. आम्ही कुठल्याही गोष्टीचा विरोध करणार नाही. पक्षाने आम्हाला प्रचार करण्यास सांगितले तर आम्ही प्रचार करू. कदाचित पक्षाला आता आमच्या पाठिंब्याचीही आवश्यकता राहिलेली नाही, अखी खंतही सिंह यांनी व्यक्त केली.
भाजपाचे माजी खासदार असलेले महेश्वर सिंह हे कुल्लू जिल्ह्यातील एका राजघराण्याशी संबंधित आहेत. महेश्वर सिंह मंडी लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले होते. तर एकदा त्यांची नियुक्ती राज्यसभेवर करण्यात आली होती. महेश्वर सिंह हेसुद्धा मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छूक होते. मात्र पक्षाने येथून कंगना राणावतला उमेदवारी दिली.