‘विरोधकांनी संधी गमावली! भाजपा ओदिशा, बंगालमध्ये नंबर १ बनणार, दक्षिणेत चमत्कार घडवणार’ प्रशांत किशोर यांचं भाकित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 10:47 AM2024-04-08T10:47:42+5:302024-04-08T10:48:43+5:30
Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएसाठी ‘अब की बार ४०० पार’चा नारा दिला आहे. त्यामुळे भाजपा हे लक्ष्य गाठणार की विरोधी पक्षांची इंडिया आघाडी भाजपाला २७२ जागांच्या आत रोखणार, याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रख्यात राजकीय अभ्यासक आणि रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी मोठं भाकित केलं आहे.
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून यावेळच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबत राजकीय विश्लेषकांकडून वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएसाठी ‘अब की बार ४०० पार’चा नारा दिला आहे. त्यामुळे भाजपा हे लक्ष्य गाठणार की विरोधी पक्षांची इंडिया आघाडी भाजपाला २७२ जागांच्या आत रोखणार, याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रख्यात राजकीय अभ्यासक आणि रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी मोठं भाकित केलं आहे. भाजपा दक्षिण आणि पूर्व भारतात मजबूत झाला असून, या निवडणुकीत भाजपा या दोन्ही भागांत मतदानाची टक्केवारी आणि जागांमध्ये लक्षणीय आघाडी घेईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. दक्षिणेत कर्नाटक वगळता भाजपा इतर राज्यांत कमकुवत आहे, ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. तसेच या निवडणुकीत भाजपा ३०० हून अधिका जागा जिंकू शकतो, असा दावाही प्रशांत किशोर यांनी केला.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी सांगितले की, भाजपाचं वर्चस्व दिसत असलं तरी भाजपा आणि नरेंद्र मोदी हे काही अजिंक्य नाहीत. विरोधी पक्षांकडे भाजपाची घोडदौड थांबवण्याच्या तीन वेगवेगळ्या संधी होत्या. मात्र चुकीची रणनीती आणि आळशीपणामुळे त्यांनी त्या संधी गमावल्या.
प्रशांत किशोर भाजपाच्या कामगिरीबाबतही मोठं भाकित केलं आहे. ते म्हणाले की, ओदिशामध्ये भाजपा निश्चितपणे पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण पश्चिम बंगालमध्येही भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनण्याच्या दिशेने आगेकूच करतोय. तसेच तामिळनाडूमध्येही यावेळी भाजपाच्या मतांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.