'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 12:15 PM2024-05-13T12:15:20+5:302024-05-13T12:17:39+5:30
Himachal Pradesh Lok Sabha Election 2024; १९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तानची निर्मिती झाली होती. मग भारताला हिंदू राष्ट्र का घोषित करण्यात आले नाही, असा सवाल कंगना राणौत हिने एका प्रचार सभेला संबोधित करताना उपस्थित केला.
हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार कंगना राणावत हिने पुन्हा एकदा हिंदू राष्ट्राचा राग आळवला आहे. १९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तानची निर्मिती झाली होती. मग भारताला हिंदू राष्ट्र का घोषित करण्यात आले नाही, असा सवाल कंगना राणौत हिने एका प्रचार सभेला संबोधित करताना उपस्थित केला.
कंगना राणौत पुढे म्हणाली की, आमचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युगपुरुष आहेत. आमच्या पूर्वजांनी मुघलांची गुलामी पाहिली आहे. त्यानंतर इंग्रजांचीही गुलामी पाहिलीय. तसेच काँग्रेसचं कुशासनही पाहिलंय. मात्र आपल्याला २०१४ मध्ये खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालंय. विचार करण्याचं स्वातंत्र्य, सनातनचं स्वातंत्र्य, धर्माचं स्वातंत्र्य, या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचं स्वातंत्र्य मिळालंय. १९४७ मध्ये तुम्ही धर्माच्या आधारावर पाकिस्तानला इस्लामिक राष्ट्र बनवलं होतं. मग भारताला हिंदू राष्ट्र का बनवलं नाही?आता आम्ही या देशाला हिंदू राष्ट्र बनवू, असं विधान कंगना राणौत हिने केलं.
कंगना हिने याआधीही असं विधान केलं होतं. त्यावेळी देशाला खरं स्वातंत्र्य हे १९४७ नाही तर २०१४ मध्ये मिळालं, असा दावा कंगना हिने केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ हे खरं स्वातंत्र्य असल्याचा दावा कंगना हिने केला होता. कंगना राणौत हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. तिचा सामना काँग्रेसचे नेते विक्रमादित्य सिंह यांच्याशी होत आहे. मंडी येथे लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात १ जून रोजी मतदान होणार आहे.