२०२४ची लोकसभा निवडणूक PM नरेंद्र मोदी तामिळनाडूतून लढवणार? दक्षिण भारतासाठी BJPची खास रणनीति!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 11:41 AM2023-06-18T11:41:29+5:302023-06-18T11:42:30+5:30
PM Narendra Modi Lok Sabha 2024: तामिळनाडूमधील कोणता मतदारसंघ पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणार? दक्षिण भारतावर भाजपचे लक्ष
PM Narendra Modi Lok Sabha 2024: २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजप यात आघाडीवर आहे. पुढील होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ३५० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे सांगितले जात आहे. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२४ ची लोकसभा निवडणूक तामिळनाडूमधून लढवू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींनी २०१४ मध्ये वडोदरा आणि वाराणसी या दोन जागांवर निवडणूक लढवली होती. तर २०१९ मध्ये त्यांनी फक्त वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत तामिळनाडू आणि वाराणसी या मतदारसंघातून पंतप्रधान मोदी निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त दिल्याचे सांगितले जात आहे.
तामिळनाडूमधील कोणता मतदारसंघ पंतप्रधान मोदी निवडणार?
तामिळनाडूमधील एका मतदारसंघाचा पंतप्रधान मोदी यांच्यासाठी विचार केला जाऊ शकतो. तो मतदारसंघ म्हणजे रामनाथपुरम. या मतदारसंघात रामेश्वरम हे हिंदू तीर्थक्षेत्र आहे. भाजपच्या रणनितीचा एक भाग म्हणून पंतप्रधान मोदी तामिळनाडूमधून लोकसभेची निवडणूक लढवू शकतात, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. मागील काही दिवसापूर्वी तामिळनाडू भाजपचे प्रमुख के. अन्नमल्लई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतून निवडणूक लढवण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतरपासून हा मुद्दा चर्चेत आला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी लोकसभेच्या दालनात सभापतींच्या खुर्चीशेजारी पवित्र सेंगोल अर्थात राजदंड स्थापित करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तामिळनाडूचे पुजारी उपस्थित होते. त्यांचा उद्देश हिंदुत्वाला पुढे नेण्याचा असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात मिळून लोकसभेच्या एकूण १२९ जागा आहेत. पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातही एक जागा आहे. २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकणाऱ्या भाजपला या १३० जागांपैकी फक्त २९ जागा मिळाल्या. कर्नाटकातील २५ जागांचा यामध्ये समावेश आहे. दक्षिणेकडील तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये भाजपचे खातेही उघडले गेले नाही.