Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 09:10 AM2024-05-29T09:10:37+5:302024-05-29T09:31:32+5:30
Lok Sabha Election 2024 Rajnath Singh And Arvind Kejriwal : राजनाथ सिंह यांनी काँग्रेससोबतच आम आदमी पक्षावरही जोरदार हल्लाबोल केला आहे.
पंजाबमधील फिरोजपूरमध्ये संरक्षण मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी काँग्रेससोबतच आम आदमी पक्षावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस आणि आप लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री असलेले 'आप' नेते (अरविंद केजरीवाल) जे बोलतात ते कधीच करत नाहीत हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. त्यांनी अण्णा हजारेंसोबत आंदोलन केलं. तेव्हा अण्णा यांनी त्यांना राजकीय पक्ष काढू नका असं सांगितलं. पण केजरीवालांनी आपल्या गुरुचं देखील ऐकलं नाही.
राजनाथ सिंह यांनी आरोप केला की, "ते म्हणाले होते जेव्हा ते मुख्यमंत्री होतील तेव्हा ते सरकारी निवासस्थानात राहणार नाहीत, तर स्वतःच्या घरात राहतील. पण नंतर त्यांनी शीशमहाल बांधला. जगभरात आपल्या देशाचा आदर वाढला आहे. पैसा आणि संसाधनांचा विचार केला तर पूर्वी भारत हा गरीब देश मानला जात होता. काँग्रेसच्या काळात आपल्या देशाची अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदींनी जादू केली आणि 8 वर्षांत आपला देश जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे."
याआधी राजनाथ सिंह यांनी दिल्लीतील एका निवडणूक सभेत म्हटलं होतं की, "यावेळची निवडणूक ही कोणत्याही उमेदवाराला जिंकण्यासाठीची निवडणूक नाही, तर ही निवडणूक देश घडवण्याची निवडणूक आहे. भारताच्या राजकारणात काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने विश्वासार्हतेवर संकट निर्माण केलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही."
"भाजपा हा देशातील एकमेव असा पक्ष आहे ज्याने आपल्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं पूर्ण केली आहेत, मग ते जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचे आश्वासन असो किंवा अयोध्येत प्रभू श्रीरामाचं भव्य मंदिर बांधण्याचं वचन असो" असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.