फक्त २ टक्के वाढलेल्या मतांमुळे जिंकता आल्या ७ जागा, ‘तृणमूल’ला फायदा, तर घटलेल्या मतदानामुळे भाजपला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 06:04 AM2024-06-09T06:04:28+5:302024-06-09T06:07:26+5:30
West Bengal Lok Sabha Election 2024 Result: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मिळालेल्या मतांची टक्केवारी वाढली असून, त्यांच्या जागांमध्येही वाढ झाली आहे. मतदार भाजपपासून दोन टक्के दूर गेल्यामुळे त्यांना त्याचा फटका बसला आहे.
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मिळालेल्या मतांची टक्केवारी वाढली असून, त्यांच्या जागांमध्येही वाढ झाली आहे. मतदार भाजपपासून दोन टक्के दूर गेल्यामुळे त्यांना त्याचा फटका बसला आहे. मात्र, अल्पसंख्याक मतदारांवरील ममता बॅनर्जी यांची मोहिनी कायम असल्याचे दिसून आले. मात्र, काही ठिकाणी डावे पक्ष-काँग्रेस आघाडीकडे अल्पसंख्याक मते वळल्यामुळे भाजपचा फायदा झाल्याचे चित्र दिसून आले.
बंगालच्या ४२ जागांपैकी यावेळी ‘तृणमूल’ने २९ जागा जिंकल्या आहेत. अनेक एक्झिट पोल्सनी तृणमूलच्या मतांच्या टक्केवारीमध्ये ७ टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, तो प्रत्यक्षात आलेला नाही. भाजपने मागील निवडणुकीपेक्षा दोन टक्के मते कमी मिळविली असली तरी त्यांना त्यामुळे सहा जागा गमवाव्या लागल्या आहेत.
गंगेच्या मैदानी क्षेत्रातही परिणाम
तृणमूल काँग्रेसने गंगेच्या मैदानी क्षेत्रातही आपला प्रभाव कायम ठेवला आहे. या भागामध्ये असलेल्या लोकसभेच्या १६ पैकी १४ जागा तृणमूलकडे गेल्या आहेत. मागील वेळी भाजपने या विभागातील तीन जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी एक जागा तृणमूलने ओढून घेतली आहे. जंगली आणि आदिवासी भागातील आठपैकी चार जागा तृणमूलने जिंकल्या.
अल्पसंख्याक मतांचा प्रभाव
पश्चिम बंगालमध्ये १६ ते १८ लोकसभा जागांवर अल्पसंख्याकांच्या मतांचा प्रभाव पडतो. रायगंज, कूचबिहार, बालूरघाट, माल्डा उत्तर आणि दक्षिण, मुर्शिदाबाद, डायमंड हार्बर, उलुबेरिया, हावडा, बीरभूम, कांथी, तामलूक, मथुरापूर आणि जॉयनगर या मतदारसंघांमध्ये अल्पसंख्याक मतदारांची संख्या मोठी आहे.
यापैकी बालूरघाट, माल्डा उत्तर आणि रायगंज या जागा भाजपने राखल्या आहेत. या तीनही जागांवर डावे-काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला मिळालेली मते ही भाजप उमेदवाराच्या आघाडीपेक्षा पुष्कळच जास्त असल्यामुळे येथील मतविभाजनाचा फायदाच भाजपला झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.