"ज्यांनी रामाच्या भक्तीचा संकल्प केला ते सत्तेत आणि विरोध करणारे…’’, RSS नेते इंद्रेश कुमार यांचा यूटर्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 06:03 AM2024-06-15T06:03:29+5:302024-06-15T06:05:19+5:30
Indresh Kumar News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांवरून (Lok Sabha Election 2024 Result ) भाजपावर केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा होत आहे. या विधानाच्या माध्यमातून इंद्रेश कुमार आणि संघाने (RSS) भाजपाचे कान टोचल्याचे बोलले जात होते. मात्र आता इंद्रेश कुमार यांनी या विधानापासून पूर्ण यूटर्न घेतला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांवरून भाजपावर केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा होत आहे. या विधानाच्या माध्यमातून इंद्रेश कुमार आणि संघाने भाजपाचे कान टोचल्याचे बोलले जात होते. मात्र आता इंद्रेश कुमार यांनी या विधानापासून पूर्ण यूटर्न घेतला आहे. ज्यांनी रामाच्या भक्तीचा संकल्प केला ते सत्तेत आणि विरोध करणारे सत्तेबाहेर बसले आहेत, असं विधान इंद्रेश कुमार यांनी केलं आहे.
याआधीच्या वक्तव्यावरून खूप वाद झाल्यानंतर इंद्रेश कुमार म्हणाले की, सध्या देशातील वातावरण खूप स्पष्ट आहे. ज्यांनी रामाला विरोध केला ते सत्तेबाहेर आहेत आणि ज्यांनी राम भक्तीचा संकल्प केला ते आज सत्तेत आहेत. तसेच तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झालं आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश चौफेर प्रगती करेल, असा विश्वास जनमानसामध्ये निर्माण झालेला आहे. तसेच हा विश्वास असाच वृद्धिंगत व्हावा, अशा आम्ही शुभेच्छा देतो.
दरम्यान, १३ जून रोजी कानोता येथे राम रथ अयोध्या यात्रा दर्शन पूजा समारंभाला संबोधिक करताना इंद्रेश कुमार भाजपाबाबत म्हणाले होते की, ज्या पक्षाने श्री रामाची भक्ती केली, मात्र ते अहंकारी झाले. त्यांना २४१ वर रोखलं गेलं. मात्र त्यांना सर्वात मोठा पक्ष बनवण्यात आलं. त्यांना जो पूर्ण हक्क मिळाला पाहिजे होता. जी शक्ती मिळायला हवी होती, ती देवाने अहंकारामुळे दिली नाही. तर ज्यांची श्री रामावर कुठल्याही प्रकारची श्रद्धा नव्हती. त्यांना एकत्रितपणे २३४ जागांवर रोखले. सगळे एकत्र मिळूनही पहिलं स्थान मिळवू शकले नाहीत. दुसऱ्या स्थानावरच त्यांना समाधान मानावे लागले. त्यामुळे देवाचा न्याच विचित्र नाही आहे, तर सत्य आहे, खूप आनंददायी आहे, असे इंद्रेश कुमार यांनी सांगितले होते.
दरम्यान, काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी इंद्रेश कुमार यांच्या वक्तव्यावरून भाजपाला टोला लगावला होता. ते म्हणाले की, इंद्रेश कुमार हे संघाचे बडे नेते आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही अहंकार आणि मणिपूरवरून भाष्य केलं होतं. भाजपाचे दोन बडे नेते अहंकारी झाले आहेत. आरएसएस आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. या लोकांना १० वर्षांमध्ये का रोखण्यात आलं नाही. संघाच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी ही विधानं का केली नाहीत, असा सवालही तिवारी यांनी उपस्थित केला.