उत्तर प्रदेशातील भाजपाच्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर योगी घेणार मोहन भागवत यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 03:31 PM2024-06-14T15:31:47+5:302024-06-14T15:33:08+5:30
Lok Sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला दारुण परभावचा सामना करावा लागला होता. उत्तर प्रदेशात असलेल्या लोकसभेच्या ८० जागांपैकी केवळ ३३ जागांवर भाजपाला विजय मिळवता आला.
लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला दारुण परभावचा सामना करावा लागला होता. उत्तर प्रदेशात असलेल्या लोकसभेच्या ८० जागांपैकी केवळ ३३ जागांवर भाजपाला विजय मिळवता आला. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या झालेल्या सुमार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. योगी आणि सरसंघचालक यांच्यात होणाऱ्या या भेटीमध्ये लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि राज्यातील संघाच्या विस्तारासह इतर मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी मोहन भागवत यांनी चिउटाहा येथील एसव्हीएम पब्लिक स्कूल येथे सुरू असलेल्या संघ कार्यकर्ता विकास शिबिरामध्ये स्वयंसेवकांना संबोधित केले. हे शिबीर ३ जूनपासून सुरू आहे. तसेच त्यामध्ये २८० हून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान, गुरुवारी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काशी, गोरखपूर, कानपूर आणि अवध या भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जबाबदारी सांभाळत असलेल्या सुमारे २८० स्वयंसेवक कार्यकर्त्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली.
मिळालेल्या माहितीनुसार सरसंघचालकांनी शाखांची संख्या वाढवण्यासाठी आणि संघटनेच्या विस्तारावर अधिक भर दिला. तसेच संघाकडून चालवण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांच्या विस्ताराबाबत सल्ला दिला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल अपेक्षेनुरूप न लागल्याने मागच्या काही काळापासून संघाचे नेते भाजपाबाबत सातत्याने प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.