११०० कोटींची संपत्ती, पण मिळाली होती फक्त १५०० मतं, डिपॉझिट सुद्धा वाचवू शकले नाहीत सर्वात श्रीमंत उमेदवार!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 09:45 AM2024-04-01T09:45:55+5:302024-04-01T10:06:38+5:30
Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील १०२ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे राजकीय बिगुल वाजले आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होणार आहे. यंदा देशात ७ टप्प्यात निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार आहे. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यातील १०२ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.
आतापर्यंत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा नकुलनाथ हे श्रीमंत खासदार ठरले होते. यावेळीही ते छिंदवाडामधून पुन्हा रिंगणात आहेत. पाच वर्षात त्यांची संपत्ती ४० कोटींनी वाढली असून, त्यांच्या नावावर सुमारे ७०० कोटींची संपत्ती आहे.
दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत रमेश कुमार शर्मा हे अपक्ष उमेदवार होते. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार रमेश कुमार शर्मा यांनी आपली संपत्ती ११०७ कोटी रुपयांहून अधिक असल्याचे जाहीर केले होते. रमेश कुमार शर्मा यांनी बिहारमधील पाटलीपुत्र मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. रमेश कुमार शर्मा यांना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यांना केवळ १५५८ मते मिळाली होती. त्यामुळे त्यांचे डिपॉझिट सुद्धा जप्त झाले होते. पाटलीपुत्र मतदारसंघातून भाजपचे राम कृपाल यादव ५ लाख मतांनी विजयी झाले होते.
कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांचा झाला होता पराभव
२०१९ च्या निवडणुकीत दुसरे सर्वात श्रीमंत उमेदवार कोंडा विश्वेश्वर रेड्डी होते, ज्यांची संपत्ती ८९५ कोटी रुपये होती. तेलंगणातील चेवेल्ला मतदारसंघातून तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) उमेदवार जी रंजीत रेड्डी यांनी त्यांचा पराभव केला होता. त्याचवेळी, नकुलनाथ हे २०१९ मधील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार होते. त्यावेळी नकुलनाथ यांनी आपली संपत्ती ६६० कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते.
ज्योतिरादित्य सिंधिया यांचाही श्रीमंत उमेदवारांच्या यादीत समावेश
२०१९ मधील चौथे सर्वात श्रीमंत उमेदवार वसंतकुमार एच होते. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती ४१७ कोटींहून अधिक असल्याचे जाहीर केले होते. वसंतकुमार तामिळनाडूच्या कन्याकुमारी मतदारसंघातून सुमारे तीन लाख मतांनी विजयी झाले होते. निवडणुकीतील पाचवे आणि सर्वात श्रीमंत उमेदवार काँग्रेसचे ज्योतिरादित्य सिंधिया होते, ज्यांनी ३७४ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती जाहीर केली होती.