सम्राट चौधरी, चंद्राबाबू नायडू, आपच्या पोस्ट्स 'एक्स'वरून हटवल्या, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 09:15 AM2024-04-17T09:15:05+5:302024-04-17T09:24:33+5:30
Lok Sabha Election 2024 : आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यामुळे या सर्व पोस्ट्स निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत एक्स प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली : सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अशाकच मंगळवारी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' ने वायएसआर काँग्रेस, आम आदमी पक्ष (आप), तेलगू देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या काही निवडक पोस्ट्स हटवल्या आहेत.
आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यामुळे या सर्व पोस्ट्स निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत एक्स प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आल्या आहेत.या संदर्भात निवडणूक आयोगाने 2 एप्रिल आणि 3 एप्रिल रोजी आदेश जारी केले होते. तसेच 10 एप्रिल रोजी आयोगाने या संदर्भात आणखी एक ईमेल पाठविला होता. यामध्ये एक्सद्वारे या पोस्ट्स हटवण्यात आल्या नाहीत, म्हणजेच जाणूनबुजून आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे प्रकरण मानले जाईल, असे म्हटले होते.
दरम्यान, "आम्ही आदेशांचे पालन केले आहे आणि निवडणुकीच्या उर्वरित कालावधीसाठी या पोस्ट ब्लॉक केल्या आहेत, परंतु आम्ही या निर्णयाशी असहमत आहोत आणि या पोस्ट्स अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत आहेत आणि सर्वसाधारणपणे राजकीय भाषणाची परवानगी असली पाहिजे", असे एक्सने म्हटले आहे.
आपल्या प्लॅटफॉर्मवर पोस्ट काढून टाकण्याचा आदेश जारी करताना एक्सने म्हटले आहे की, "पारदर्शकता लक्षात घेऊन आम्ही प्रभावित युजर्सला माहिती दिली आहे." दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवार, 19 एप्रिलपासून सुरू होणार आहे. 7 टप्प्यात होणारी ही निवडणूक 1 जून रोजी संपणार असून त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होणार आहेत.